Top Trending IPO in September : गुंतवणूकदारांसाठी सप्टेंबर महिना आतापर्यंत कमालीचा फायदेशीर ठरला आहे. या महिन्यात अनेक आयपीओ आले, जे लोकप्रिय ठरले. याशिवाय या शेअर बाजारातही उत्साह बघायला मिळतो आहे. या महिन्यातील काही लोकप्रिय आयोपीओंमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स, आरकेड डेव्हलपर्स, नॉर्दन आर्क आणि पुना गाडगीळ या कंपन्यांच्या आयपीओंचा समावेश आहे. या आयपीओंच्या वाढत्या मागणीवरून गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारातील विश्वास दिसून येतो आहे. याव्यतिरिक्त मनबा फायनान्स आणि कलाना इस्पात या कंपन्यांच्या आयपीओंकडेही अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यातील कोणते आयपीओ लोकप्रिया ठरले? त्यांचं प्रदर्शन नेमकं कसं राहिलं आहे, याविषयी जाणून घेऊया.

बजाज हाऊसिंग फायनान्स :

बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ या महिन्यात सर्वात लोकप्रिय ठरला. गुगल ट्रेण्डवरही या आयपीओची जोरदार चर्चा बघायला मिळाली. या आयपीओसाठी एकूण ८८.९४ लाख अर्ज प्राप्त झाले, ज्याची किंमत जवळपास ३.२४ लाख कोटी रुपये इतकी होती. या आयपोपीओने आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वच विक्रम मोडीत काढले.

हेही वाचा – बाजाराचा तंत्र-कल : निफ्टीच्या २५,८०० ते २६,१०० या तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा

आरकेड डेव्हलपर्स :

आरकेड डेव्हलपर्सचा आयपीओसुद्धा या महिन्यात लोकप्रिय ठरला. या आयपीओचं लिस्टिंग आज पार पडलं. त्यानुसार सुरुवातीला या शेअर्सची किंमत १७५ एवढी होती. ज्यात मूळ किंमतीच्या ३७ टक्के वाढ बघायला मिळाली. महत्त्वाचे म्हणजे लिस्टिंगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये आरकेड डेव्हलपर्स शेअर्सचे प्रिमिअमची मजबूत स्थिती बघायला मिळाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांपर्यंत नफा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही.

नॉर्दर्न आर्क :

२० सप्टेंबर रोजी नॉर्दर्न आर्कच्या आयपीओचे लिस्टिंग करण्यात आले. या आयपीओसाठी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली होती. या कंपनीचे २.१४ कोटी शेअर्स आयपीओद्वारे उपलब्ध करण्यात आले होते. पण गुंतवणूकदारांनी एकूण २३८ कोटी शेअर्ससाठी बोली लावली. महत्त्वाचे म्हणजे आयपीओ लिस्टींगपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून २२९ कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त केली होती.

हेही वाचा – Sensex Today: सेन्सेक्सची उसळी! ८५ हजारांचा विक्रमी टप्पा पार, निफ्टीनंही गाठला उच्चांक!

पुना गाडगीळ ज्वेलर्स :

पुना गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओसाठीही अनेकांनी प्रयत्न केले होते. १० सप्टेंबर रोजी आयपीओसाठी सबस्क्रिप्शन सुरू झाले, तर १३ सप्टेंबर रोजी अंतिम वाटप पूर्ण झाले. १७ सप्टेंबर रोजी जेव्हा लिस्टिंग पार पाडली, तेव्हा शेअर बाजारात या शेअर्सची किमंत ८३० रुपयांवर पोहोचली होती. यात आयपीओच्या मुळ किंमती पेक्षा ७३ टक्क्यांना वाढ झाल्याचं बघायला मिळालं होतं. या शेअर्सच्या माध्यमातून कंपनीने १ हजार १०० कोटी रुपयांची गुंतवणूक उभी केली.