आळंदी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थळ म्हणून ओळखले जाते. या नगरीला देवाची आळंदी असेही म्हणतात. पुण्यापासून अवघ्या २० किमीवर असेलेल्या आळंदी येथे वाहणारी इंद्रायणी नदी तुम्हाला माहिती असेल.
सध्या याच इंद्रायणी नदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नदीत पांढऱ्याशुभ्र फेसाचे आच्छादन दिसून येत आहे. सध्या हा विषय चांगलाच चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला इंद्रायणी नदी दिसेल. या नदीत तुम्हाला पांढऱ्याशुभ्र फेसाचे अनेक आच्छादन दिसून आली. क्षणभरासाठी तुम्हालाही कळणार नाही, हा नेमका काय प्रकार आहे? पण हा जलप्रदूषणाचा भाग आहे. आळंदी सारख्या तिर्थस्थानी असे जलप्रदूषण होत असेल तर नक्कीच यावर विचार करणे आणि प्रशासनाने लवकर लक्ष घालणे गरजेचे आहे.
हा व्हिडीओ pune_is_loveee या अकाउंटवरुन चार दिवसापूर्वी शेअर करण्यात आला आहे. नेमका हा प्रकार केव्हाचा आहे, याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आळंदी येथे वाहणाऱ्या इंद्रायणी नदीत आज असे पांढऱ्याशुभ्र फेसाचे आच्छादन दिसून आले आहेत. नदीत केमिकलयुक्त पाणी सोडले जात असल्यामुळे हा फेस तयार झाला आहे…”
हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “लवकर लक्ष दया आमदार आणि खासदार. इंद्रायणी हे आपले तीर्थस्थान आहे. अशी विटंबना होऊ देऊ नका. केमिकलमुळे नदीतील मासे मरताहेत” तर एका युजरने लिहिलेय, “सरकारला माझी हात जोडून विनंती आहे… साहेब कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आमच्या इंद्रायणी मायेला वाचवा”