दारूच्या नशेत गाडी चालवणे कायद्याने गुन्हा आहे, मात्र अनेक चालक कायदा पायदळी तुडवून नियम मोडताना दिसतात. अशाचप्रकारे हरियाणामध्ये मद्यधूंद कारचालक रस्त्यावरून अतिशय धोकादायक पद्धतीने गाडी चालवत होता, ज्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याला अडवले. पण, चालकाने न थांबता थेट पोलिसालाच चालत्या गाडीबरोबर फरफटत नेले. यावेळी मागे बसलेल्या दोघांनी आपला जीव वाचवण्यासाठी चालत्या गाडीतून चक्क उड्या मारल्या. यानंतर पुढे जे काही झालं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,
या व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी वाहन थांबवण्याच्या प्रयत्नात आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे. मात्र, संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, पोलिस कर्मचारी केवळ वाहन थांबवण्याचा प्रयत्न करत नाही तर अनेकांचे प्राण वाचवण्याचाही प्रयत्न करतात. होय, व्हायरल झालेला व्हिडीओ फरीदाबादला लागून असलेल्या बल्लभगढचा असल्याचे सांगण्यात येत आहे,
या पोलिस कर्मचाऱ्याने कार थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र मद्यधूंद कारचालक पोलिस कर्मचाऱ्याला चकमा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, यावेळी कार रोखणाऱ्या पोलिसाला तो चालक थोड्या अंतरावर फरफटत घेऊन गेला, पण पोलिसाने प्रयत्न करून त्याला गाडी रोखण्यास भाग पाडले. यानंतर चालकाला कॉलरला पकडून बाहेर ओढले आणि पोलिस ठाण्यात घेऊन गेले.
कागदपत्रे मागितल्याने झाली वादावादी
ही संपूर्ण घटना बल्लभगड बसस्थानकाजवळ घडली, जिथे शुक्रवारी संध्याकाळी राजस्थानमधील वाहनचालकाला पोलिसांनी रोखले. त्यानंतर पोलिसांनी चालकाकडून कागदपत्रे मागितली, मात्र मद्यधूंद कारचालकाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि वाद सुरू असताना त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका पोलिस कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून कारच्या दरवाजाला लटकून चालकाला रोखले. यावेळी चालकाने कार थोड्या अंतरावर नेली, मात्र त्यानंतरही पोलिस कर्मचाऱ्याने कार सोडली नाही. शेवटी डिव्हायडरला जाऊन आदळणार इतक्यात चालकाने कार रोखली.
चालत्या वाहनातून दोघांनी मारली उडी
यावेळी कारच्या मागच्या सीटवर बसलेले दोन प्रवासी देखील खूप घाबरले. कारण चालक आणि पोलिस यांच्यात सुरू असलेल्या झटापटीत कार अनियंत्रितपणे चालत होती. रस्त्यावर लोकांची गर्दी होती. कार अनियंत्रितपणे चालत असताना दोन प्रवाशांनी चालत्या कारमधून उडी मारली आणि कसा तरी स्वतःचा जीव वाचवला. या झटापटीत कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावरही चढली, मात्र पोलिसांनी चालकाला पळून जाऊ दिले नाही. यानंतर दोघांमध्ये चावी काढण्यावरुन बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी चालकाला पकडून पोलिस ठाण्यात नेले.
व्हायरल व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. बहुतेक लोक पोलिसांचे कौतुक करत आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले की, अशा लोकांवर कडक कारवाई व्हायला हवी.