Traffic Jam on Mount Everest : मुंबई, बंगळुरू व दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये ट्रॅफिक जामची समस्या सामान्य आहे. परंतु, जगातील सर्वांत उंच पर्वत असलेल्या माउंट एव्हरेस्टवरही आता ट्रॅफिक जामची समस्या भेडसावताना दिसतेय. होय, तुम्हाला हे ऐकताना थोडे विचित्र वाटेल; पण सोशल मीडियावर एक फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय ज्यात एव्हरेस्टवर चढण्यासाठी गिर्यारोहकांची लांबच लांब रांग लागल्याची पाहायला मिळत आहे.
जगातील सर्वांत उंच माउंट एव्हरेस्टवर चढण्याची मोहीम यशस्वी करण्यासारखा दुसरा कोणताच मोठा आनंद गिर्यारोहकांसाठी नसतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या शिखर मोहिमेवर जाणाऱ्यांची संख्याही झपाट्यानं वाढताना दिसतेय. अशा परिस्थितीत गिर्यारोहक आता शिखर गाठण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसले. शिखर चढण्या आणि उतरण्यासाठी गिर्यारोहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माउंट एव्हरेस्टवरील ही जीवघेणी परिस्थिती पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
माउंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची गर्दी
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, गिर्यारोहक जगातील सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर रांगेत उभे असल्याचे दिसले. गिर्यारोहक धोकादायक ‘डेथ झोन’ ओलांडण्यासाठी धीराने आपली वेळ येण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, @NGKabra नावाच्या एका एक्स युजरने या जीवघेण्या परिस्थितीचा एक फोटो शेअर करीत लिहिले, “मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ट्रॅफिक जॅमबद्दल तक्रार करू नका. माउंट एव्हरेस्टवरही तासन् तास ट्रॅफिक जाम आहे. खरी समस्या ही आहे की, सर्वांना एकच काम एकाच दिवशी करायचे आहे; पण ही समस्या केवळ माउंट एव्हरेस्टवर नाही, तर देशभरातील इतर पर्यटनस्थळीही पाहायला मिळतेय.
हेही वाचा – रिक्षाचालकाला इंग्रजी गाण्याची पडली भुरळ; भरट्रॅफिकमध्ये मोठ्याने गाणी वाजवत…; मजेशीर Video व्हायरल
ख्रिसमस आणि न्यू इयरनिमित्त पर्यटकांनी हिमाचल, मनाली अशा अनेक पर्यटनस्थळांवर गर्दी केली आहे; ज्यामुळे ठिकठिकाणी पर्यटकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतोय. परंतु, माउंट एव्हरेस्टवरील ही ट्रॅफिक जामची समस्या गिर्यारोहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खरंच जीवघेणे ठरणारी आहे. कारण- यापूर्वी उदभवलेल्या अशा परिस्थितीत अनेक गिर्यारोहकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
दरम्यान, गिर्यारोहकांना चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी या पर्यटकांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागतेय. माउंट एव्हरेस्टचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. काही लोकांनी माउंट एव्हरेस्टवरील अपघातांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये यावर भर दिला, तर काहींनी असे म्हटले की, पर्वत शिखर आणि गजबजलेल्या शहराची वाहतूक यांची तुलना करणे हास्यास्पद आहे. एका युजरने आश्चर्य व्यक्त करत म्हटले, “व्वा! क्या बात है, ट्रॅफिक जॅम फक्त बेंगळुरू, मुंबई, दिल्लीतच होत नाही; माउंट एव्हरेस्टवरही होतो.”