Mumbai Traffic Police Beating Man In The Middle Of The Parel Signal Road : वाहन चालविताना ट्रॅफिक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक वाहनचालकासाठी बंधनकारक असते. वाहतूक नियमांना पायदळी तुडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही अनेक चालक नियम धाब्यावर बसवून वाहन चालविताना दिसतात. अशा वेळी नियम मोडणारे चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची होते. अशा घटनांदरम्यान अनेकदा वाद होतात. कित्येकदा हे वाद टोकाला जाऊन पोहोचतात. असे असले तरी वाहतूक पोलिसांना कोणत्याही चालकांना कायद्याने मारहाण करण्याचा अधिकार नाही. मात्र, मुंबईतील एका सिग्नलवर वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्या वाहनचालकाला भररस्त्यात मारहाण करीत अपमानास्पद वागणूक देताना दिसतायत. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी खूप संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर सिग्नल सुरू असल्याने सर्व गाड्या थांबल्या आहेत. यावेळी रस्त्याच्या मधोमध दोन वाहतूक पोलीस अधिकारी वाहतूक नियंत्रित करीत होते. याचदरम्यान ते एका बाईकस्वाराला थांबवून त्याला चौकीत चल, असे सांगतात. यावेळी तो खाली उतरून बाईक त्या दिशेने वळवत असतो. पण तो असे करीत असताना एक वाहतूक पोलीस चालकाच्या जवळ येतो. तो आधी त्याचे डोके पकडतो आणि त्यानंतर चालकाच्या डोक्यात जोरात मारतो. यावेळी रस्त्यावर पडलेली एक वस्तू पोलीस अधिकारी चक्क लाथेने उडवून देतो. पोलिसांची भररस्त्यात सुरू असलेली ही मुजोरी सिग्नलवर थांबलेले सर्व लोक पाहत होते. हेल्मेट नसल्यामुळे चालकाला पोलिसांनी थांबवले आणि मारहाण केली, असे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ मुंबईतील परळ या परिसरातील एका सिग्नलवरील असल्याचे सांगितले जात आहे.

“मुंबई ट्रॅफिक पोलिसांची मुजोरी”, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्स करीत पोलिसांचा निषेध केला आहे. @the_hungry_traveler.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात युजरने, ट्रॅफिक पोलिसांनी चालकाकडून ‘फाईन’ घ्यायला हवा होता; पण ह्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल करीत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

कॉलेजमध्ये प्रँक करणे पडले महागात; विद्यार्थ्यांच्या अंगावर घातली कार; पोलिसांनी घडवली ‘अशी’ अद्दल, पाहा video

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी पोलिसांच्या या मुजोरीवर टीका करीत आहेत. अनेकांनी वाहतूक पोलिसांना चालकाला मारण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित करीत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेकांनी मुंबईतील ट्रॅफिक पोलीस कशा पद्धतीनं दादागिरी दाखवतात याबद्दलचे अनुभव शेअर केले आहेत.

एका युजरने तीव्र संताप व्यक्त करीत लिहिले की, अरे, हे सार्वजनिक सेवा देणारे अधिकारी. भाई, आपण भरत असलेल्या टॅक्सवर ह्यांचा पगार निघतो आणि हेच आपल्यावर दादागिरी करतात. आणखी एका युजरने लिहिले की, यांच्या खिशात निबंध नाही वाटतं. दरम्यान, अनेक नेटकऱ्यांचे हेच मत आहे की, भले चालकाची चुकी असेल; पण पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे होती. त्यांना चालकाला मारण्याचा कोणताही अधिकार कायद्याने दिलेला नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police brutally beating man in the middle of the mumbai parel signal road due to break a traffic rule netizens angry reaction over poor video viral sjr