Viral video: हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते. याचदरम्यान हैदराबादमधून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये चक्क मंदिरामध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओतून सकाळी घराबाहेर गेलेली व्यक्ती पुन्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
हैदराबाद येथील मंदिरात सोमवारी सकाळी एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुकटपल्ली हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील अंजनेय स्वामी मंदिराच्या खांबाला प्रदक्षिणा घालत असताना ३१ वर्षीय विष्णुवर्धन तरुणाला मृत्यूनं कवटाळलं. या घटनेचा एक कथित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक सत्यसाई जिल्ह्यातील कादिरी येथील असून ते हैदराबादमधील एका खासगी कंपनीत काम करत होते. तो मंदिराच्या आवारात कोसळल्यानंतर, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भक्तांनी आपत्कालीन परिस्थिती त्वरित ओळखली आणि CPR वापरून विष्णुवर्धनला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. हैदराबादमधील या मंदिरात हा तरुण नेहमी यायचा त्यामुळे त्याच्या अकाली निधनामुळे मंदिरातील भाविक आणि मृताच्या नातेवाईकांनी शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, घटनेचा नेमका क्रम समजून घेण्यासाठी त्या घटनेचे फुटेजही तपासण्यात आले असून पोलीस साक्षीदारांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. अहवालानुसार, विष्णुवर्धनला मदत करण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते, परंतु ते पोहोचेपर्यंत त्याटा आधीच मृत्यू झाला होता. दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ jsuryareddy नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “हे आयुष्य बिनभरवशाचं आहे”, तर आणखी एकानं “देवालाही त्याची दया आली नाही”
सीपीआर म्हणजे काय?
हृदयविकाराचा झटका आल्यावर सीपीआर देतात म्हणजे नेमके काय? तर सीपीआरचा अर्थ कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. एखादी व्यक्ती आजारी पडली, तिची शुद्ध हरपली, ती श्वासोच्छवास करीत नाहीये किंवा श्वास मंदावला आहे, अशी कोणाचीही स्थिती उदभवल्यास सीपीआर दिला गेला पाहिजे. या उपचार प्रक्रियेद्वारे त्या व्यक्तीच्या फुप्फुसाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. छातीवर दाब देणे आणि तोंडाद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.