Shocking video: सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका तरुणाला आपला जीव धोक्यात घालून रील बनवणं चांगलंच महागात पडलंय. रील बनविताना एक चूक झाली आणि तो थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला. मृत्यूचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ही घटना घडली असून रील शूट करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. इंस्टाग्राम रीलसाठी स्लो मोशनमध्ये शूटिंग करत असताना संरक्षणासाठी मजल्यावर बसवलेले रेलिंग उघडल्यानंतर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेत तरुणाच्या डोक्याला आणि मानेला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
सराफा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफा बाजार येथे ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ शूट करताना तरुणाचा मृत्यू झाल्याची भीषण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जो तरुण त्याच्या मित्रांसोबत आला होता तो रीलसाठी व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तरुण स्लो मोशनमध्ये नाचताना आणि त्याच्यापासून काही अंतरावर बसलेल्या त्याच्या मित्राकडे चालताना दिसत आहे. रीलसाठी स्लो मोशनमध्ये नाचत आणि चालत असताना तो त्याच्या मित्राकडे जातो. मजल्यावर बसवलेले संरक्षक रेलिंग उघडताच तो तिसऱ्या मजल्यावरून घसरतो आणि जमिनीवर पडतो. यावेळी त्याच्या एका मित्राने त्याला पकडण्याचाही प्रयत्न केला कारण तो एका सेकंदासाठी लोखंडी जाळी धरू शकला. मात्र, तो तरुणांना पकडण्यात अपयशी ठरला आणि जमिनीवर कोसळला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “मेरी दुनिया तू ही रे” लेकीच्या लग्नात वडिलांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यांत येईल पाणी
“एक चूक आई-वडिलांना कायमचं दु:ख देऊन जाईल”
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी रील बनवण्याच्या आवडीपोटी तरुणांनी आपला जीव गमावल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत. सोशल मीडियावरील काही लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी ते आपला जीव धोक्यात घालतात. नुकत्याच झालेल्या एका घटनेत महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रीलचे शूटिंग करत असताना कार उलटून एका महिलेला दरीत पडून तिचा जीव गमवावा लागला. या व्हिडीओवर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “एक चूक आई-वडिलांना कायमचं दु:ख देऊन जाईल” तर आणखी एक जण म्हणतोय, “काही क्षणांच्या आनंदासाठी असं नका करू.”