Train Viral Video: रेल्वे अपघाताचे अनेक भयानक व्हिडीओ समोर येऊनही प्रवासी दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसतात. अनेकदा रेल्वेच्या गेटवर लटकून प्रवासी प्रवास करतात, यावेळी कधी विजेच्या खांबाला धडकून अनेक प्रवासी मृत्यूमुखी पडतात. याबाबत रेल्वेकडून अनेक जनजागृती मोहीमाही राबवल्या जातात, तरीही काही प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जीवघेण्या रेल्वे प्रवासाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
अनेकवेळा प्रवासी रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना दिसून आले आहेत. ट्रेनच्या छताच्या थोड्या वर एक हाय टेंशन वायर असते जिचा शरीराचा कोणत्याही भागाला स्पर्श झाला जागीच मृत्यू होऊ शकतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनच्या गेटवर उभे राहून अनेक प्रवासी जीवघेणा प्रवास करताना दिसते, अशाप्रकारे हे प्रवासी आपल्या जीवाशी खेळ करत आहेत.
ट्रेनच्या छतावर बसून अन् खिडकीला लटकून जीवघेणा प्रवास
रेल्वेकडून वारंवार सूचना देऊनही काही प्रवासी निष्काळजीपणा करताना दिसतात आणि आपली जीव दावणीला बांधून प्रवास करतात. अशाच गोष्टींमुळे रेल्वे अपघाताच्या घटना घडतात. आता व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये प्रवासी ज्या प्रकारे जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत ते पाहून कोणाच्याही अंगावर सरकन काटा येईल.
ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या ट्रेनमध्ये प्रवासी इतके कोंबून भरल्यासारखे उभे आहेत, ज्यामुळे प्रवाशांना नीट श्वास घेण्यासाठीही सोय नाही. अशा परिस्थितीत अनेक प्रवासी ट्रेनच्या गेट आणि खिडकीवर लटकून तर काही प्रवासी हे छतावर बसून प्रवास करत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या सर्व डब्यांच्या गेटवर लटकून प्रवासी प्रवास करत आहेत.
ट्रेन संथ गतीने धावत आहे, त्यामुळे लोक एकमेकांना पकडून ट्रेनच्या पायऱ्यांवर लटकताना दिसत आहेत. इतकंच नाही तर काही प्रवासी ट्रेनच्या छतावर हाय टेन्शन वायरमुळे मान खाली करुन बसलेले दिसत आहेत. त्याचवेळी काही लोक दोन बोगीच्या मधील गॅपमधून ट्रेनच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करत आहेत.
मोठा रेल्वे अपघात होण्याची शक्यता
ट्विटरवर व्हायरल होणारी ही व्हिडिओ शामली ते दिल्लीला जाणारी आहे. जी बागपत, खेरका, नोली येथून जाते. हा व्हिडिओ नोली रेल्वे स्थानकावर रेकॉर्ड करण्यात आला आहे. या ट्विटमधून युजरने रेल्वे सेवेला आरपीएफला या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले. हा व्हिडीओ खूपच भयावह आहे कारण ट्रेनच्या छतावर ज्या प्रकारे लोक बसलेले दिसत आहेत ते पाहता, ते केव्हाही तारेला धडकून मृत्यूमुखी पडू शकता. याशिवाय रेल्वेच्या गेटवरील पायऱ्यांवर प्रवासी बॅग घेऊन लटकताना दिसतात, त्यामुळे विजेच्या खांबाला धडकून मृत्यूचा धोका वाढतोय. त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना प्रत्येकाने जीवाची काळजी घेतली पाहिजे. गर्दी असल्यास रेल्वेच्या दरवाजात लटकून प्रवास करणे टाळले पाहिजे.