भारतात रेल्वेने प्रवास करताना अनेकदा तुम्हाला गरीब किंवा तृतीयपंथी लोक पैसे मागताना दिसतात. यावेळी प्रवासी एकतर त्यांना पैसे देतात किंवा थेट नाही सांगून टाळतात. अशावेळी तेही लोक शांतपणे निघून जातात. पण, एका ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तृतीयपंथी लोकांचा एक धक्कादायक अनुभव आला आहे. पैसे न दिल्याने तृतीयपंथींनी धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना चक्क मारहाण केली आहे. बिहारच्या पाटणा-कटिहार इंटरसिटीमध्ये ही घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवेळी प्रवाशांनी रेल्वेकडून मदत मागितली, मात्र यावर रेल्वेने प्रकरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वर्ग करण्यात वेळ घालवला.
ट्रेनमध्ये तृतीयपंथींनी प्रवाशांना केली मारहाण
बिहारच्या पाटणा-कटिहार इंटरसिटीमध्ये पैसे न दिल्याच्या रागातून तृतीयपंथींनी प्रवाशांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, ट्रेनमध्ये काही तृतीयपंथी चढले. यावेळी त्यांनी प्रवाशांकडून पैसे मागण्यास सुरुवात केली, पण काही प्रवाशांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना २४ फेब्रुवारीच्या रात्री घडली.
या घटनेचा व्हिडीओ @aazdrajeev नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आता खूप व्हायरल होत आहे.
तक्रारीनंतर रेल्वेने दुसऱ्या दिवशी तृतीयपंथींना केली अटक
ट्रेनमध्ये सहसा कोणतीही घटना घडते तेव्हा प्रवासी रेल्वेकडे तक्रार करतात. या घटनेबाबतही प्रवाशांनी रेल्वेच्या दानापूर विभागाकडे तक्रार केली. पण, हे प्रकरण दानापूर सोनपूर विभागाकडे सोपवले. सोनपूर विभागाने हे प्रकरण आरपीएफकडे सोपवले. त्यानंतर हे प्रकरण दानापूर रेल्वे विभागाच्या TTE अंतर्गत येत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर अखेर २५ फेब्रुवारीला आरपीएफने प्रवाशांना मारहाण करणाऱ्या तृतीयपंथींना अटक केली आहे.
घटनेवर रेल्वेने दिले ‘असे’ उत्तर
व्हायरल होत असलेल्या या प्रकरणावर अनेकांनी संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘हे सर्व काय होतंय, हे सगळं कधी थांबणार?’ आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘सर्व जीआरपी आणि आरपीएफच्या संगनमताने हे लोक ट्रेनमध्ये सामान्य स्लीपरमधून खंडणी उकळण्यात गुंतलेले असतात.’ तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘अनेक तृतीयपंथी चांगले असतात. जे पैसे देतात त्यांच्याकडून ते घेतात, पण ज्यांच्याकडे नाहीत त्यांना ते जाऊ देतात, पण बरेच जण जबरदस्तीने खिशात हात घालून पैसे काढून घेतात.’