AC For Buffaloes Video : भारतात उन्हाचा कडाका झपाट्याने वाढतेय. त्यामुळे देशाच्या विविध भागांतील नागरिकांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागतोय. पण केवळ माणसांचीच नाही, तर प्राण्यांचीही स्थिती उष्णतेमुळे बिकट होत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर साधे चिटपाखरूही दिसत नाही. लोक अशा परिस्थितीत घरात थांबण्यालाच पसंती देत आहेत. पण दुसरीकडे उष्माघातामुळे मुके प्राणिमात्र जीव गमावताना दिसत आहेत. पंखे, कूलर, एसी वापरून माणसे उष्णतेपासून स्वत:चे संरक्षण करतात; मात्र मुक्या प्राण्यांचे काय? ते कोणाला सांगणार? याच गोष्टीचा विचार करून अनेक लोक आपल्या पाळीव प्राण्यांसाठी पंखे, कूलर बसवताना दिसतात. पण, एका पठ्ठ्याने आपल्या म्हशींसाठी चक्क गोठ्यात एसी बसवले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्ही आतापर्यंत पाळीव प्राण्यांसाठी पंखे, कूलर बसविल्याचे पाहिले असेल; पण प्राण्यांच्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी एसी बसविल्याचे कधी पाहिले आहे का? व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने म्हशींचे कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यात एक नाही, तर चक्क दोन एसी बसवले आहेत. एसीने कूल झालेल्या गोठ्यात म्हशीदेखील अगदी आरामात बसल्या आहेत. त्यांच्यासह त्यांची पारडेदेखील आहेत. विशेष म्हणजे या गोठ्यात खास म्हशींसाठी आधीपासून दोन फॅन आहेत; पण उन्हाळ्यात त्यांच्यासाठी खास एसीची व्यवस्था करण्यात आली आहे. या अनोखा गोठ्याचा व्हिडीओ पाहून युजर्सनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी या व्हायरल व्हिडीओखाली विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.
हा मजेशीर व्हिडीओ @manjeetmalik567 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “अंबानींच्या म्हशी आहेत वाटतं”. आणखी एका युजरने म्हटले, “म्हशींना एसीमध्ये ठेवू नका. त्यांची तब्येत बिघडू शकते.” त्याचबरोबर काहींनी, तारेवरून चोरी केलेल्या विजेचा वापर करून ही एसी सुरू केल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी मस्त आयडिया असल्याचे म्हणत शेतकऱ्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान वाढच्या तापमानामुळे जनावरांना विविध आजारांचा धोका निर्माण होतोय. यामुळे त्यांना वेळावर खायला देणे, थंडगार वारा असलेल्या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय करणे गरजेचे आहे. यासह उन्हाळ्यात त्यांना पोटभरून पाणी प्यायला देणे आवश्यक आहे, शक्यतो दुपारच्या वेळी त्यांना गोठ्यातून बाहेर जाऊ देऊ नका, संध्याकाळी ऊन कमी झाल्यानंतर त्यांना बाहेर सोडा, ते राहत असलेल्या गोठ्यात उन्हाच्या झळा जाणवत असतील तर सुतापासून तयार केलेल्या गोण्या पाण्यात भिजवून त्यांच्या जवळ पसरवून ठेवा.