कोणतेही वस्तू खरेदी करायची म्हटलं की तिची किमंत कमी करण्यात महिलांची बरोबरी कोणी करु शकत नाही. कारण याबाबतीत त्या खूप हुशार असतात. त्यामुळे त्यांच्याकडे खरेदीची उत्तम कला असल्याचं म्हटलं जातं. सध्या एका महिलेने अशीच एक खरेदी केली आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हो कारण या महिलेने ३ घरांची खरेदी केवळ २७० रुपयांमध्ये केली आहे. या गोष्टीवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही सत्य घटना आहे.
इतक्या स्वस्तात घर खरेदी करणारी महिला कोण आहे आणि तिने ही घरे कुठे खरेदी केली आहेत? ते जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील महिलेने या घरांचा व्यवहार केला आहे. घरे खरेदी करणाऱ्या महिलेचं नाव रुबिया डॅनियल असे आहे. इटलीतील सिसिलीमध्ये रुबियाने ३.३० डॉलर म्हणजेच केवळ २७० रुपयांना ही घरे खरेदी केली आहेत. यासोबतच रुबिया १० हजार लोकसंख्या असलेल्या मुसोमेली या छोट्याशा शहरात राहायला आली आहे. रुबियाने खरेदी केलेल्या तिन्ही घरांसाठी मोठा प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार ती या ३ घरांपैकी एक घर ती राहण्यासाठी वापरणार आहे, तर इतर दोन घरांचा ती शहराच्या हितासाठी वापर करणार आहे.
महिलेने सांगितला प्लॅन –
तिने सांगितलं, एक घर कलादालनात रूपांतरित करण्याचा विचार आहे, तर दुसरे घर लोकांच्या सोयीसाठी वेलनेस सेंटरमध्ये रूपांतरित करणार आहे. यापैकी वेलनेस सेंटर हा तिचा सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं सांगितल जात आहे. घरे खरेदी केल्यानंतर रुबियाने त्यांची कामे करून घेण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत, दोन घरांच्या बाहेरील भागाची कामे पुर्ण झाली आहेत.
इटलीच्या अनेक शहरांमध्ये कमी किमतीत घरे विकली जातात. त्याचं कारण म्हणजे, जगभरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी इटली घटत्या लोकसंख्येच्या गंभीर समस्येसा सामना करत होती. लोकसंख्या कमी झाल्याने शहरं ओस पडली आहेत. त्यामुळे शहरांमधील घरे प्रचंड कमी किंमतीत विकली जात आहेत. २०१९ मध्ये, सिसिली शहरात १ डॉलर पेक्षा कमी किमतीत घरे विकली जात होती. ही घरे खूप स्वस्तात मिळत असली तरी, या घरांच्या दुरुस्तीसाठी २४ हजार ते ९० हजार डॉलरपर्यंत म्हणजे सुमारे २० ते ७० लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.