राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील भिलवाडा जिल्ह्यातील एक मुलगी तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली म्हणून संतापलेल्या कुटुंबीयांनी थेट तिला मृत घोषित केलं आणि तिच्या मृत्यूची शोकपत्रिकादेखील छापली. एवढेच नव्हे तर मुलगी मृत झाल्याचं सांगत कुटुंबीयांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवणाचे आयोजनदेखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर कुटुंबीयांनी छापलेली शोकपत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर मुलीचा मृत्यू झाला म्हणून कुटुंबीयांनी १३ जून रोजी जेवणाचं आयोजन केलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील मंगरू पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रतनपुरा गावातील एक मुलगी तिच्याच जातीतील एका मुलासोबत पळून गेली. मुलगी पळून गेल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसात केली होती. पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असता मुलगी सापडली, त्यानंतर पोलिसांनी मुलीला तिच्या घरी आणले. मात्र मुलीने तिच्या कुटुंबीयांना ओळखण्यास नकार दिला, त्यामुळे रागावलेल्या कुटुंबीयांनी मुलीला थेट मृत घोषित केलं.
दरम्यान, या मुलीच्या घरचे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मुलीच्या नावाने शोकपत्रिका छापली आणि ती तिच्या मित्रांसह नातेवाईकांना पाठवली. शिवाय मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगत त्यांनी १३ जून रोजी जेवणाचं आयोजनदेखील केलं आहे. कुटुंबीयांनी शोकपत्रिकेत लिहिलं आहे, “आम्ही अत्यंत दुःखाने कळवत आहोत की, भैरूलाल लाठीजी यांची मुलगी सुश्री प्रिया जाट हिचे १ जून २०२३ रोजी निधन झाले आहे, त्यांचा पीहर गौरणी सोहळा १३ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.” शोकपत्रिकेवर कार्यक्रमाचे ठिकाणदेखील लिहिलं आहे.
हेही पाहा- धोनीच्या फॅनने छापली नादखुळा लग्नपत्रिका; एका बाजूला थाला तर दुसऱ्या बाजूला नंबर सात, फोटो Viral
मुलीची शोकपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल –
ही शोकपत्रिका मनीष चौधरी नावाच्या तरुणाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. जी आतापर्यंत २ हजार ५०० हून अधिक लोकांनी लाइक केली आहे. कुटुंबीयांनी छापलेली शोकपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने, “हे चुकीचे आहे, पालकांनी मुलीची भेट घेऊन तिला समजावून सांगायला हवे, मला वाटते की ती मुलगी परिपक्व नाही आणि तिने चुकीचे पाऊल उचलले आहे. पण पालक परिपक्व आहेत. भविष्यात येणाऱ्या प्रत्येक योग्य-अयोग्य परिस्थितीबद्दल तिला समजावून सांगितले पाहिजे.” तर आणखी एकाने कुटुंबीयांनी चांगला निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.