महिंद्रा ग्रुपचे चेअरमन उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या फॉलोअर्ससाठी सतत नवनवीन गोष्टी शेअर करत असतात. शिवाय ते लोकांच्या वेगवेगळ्या जुगांडांची अनोख्या संशोधनाची दखल घेत असतात. तसेच ते त्यांच्या वैयक्तिक जीवन, व्यावसायिक धोरणे आणि विविध विषयांशी संबंधितही ट्विट करत असतात. आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडियावर अनेक फॉलोवर्स आहेत. जे त्यांना काही भन्नाट फोटो किंवा व्हिडीओ पाठवत असतात, यामध्ये कधी ते गावकऱ्यांनी केलेल्या अनोख्या जुगाडाचे तर कधी एखाद्या मोठ्या ब्रॅंडच्या डुप्लिकेट प्रॉडक्टचे मजेशीर फोटो शेअर करतात.
सध्या अशाच दोन मोठ्या कंपनीच्या डुप्लिकेट शूजचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणं कठीण होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी आदिदासच्या एका भन्नाट देशी प्रॉडक्टचा फोटो सोशल मीडियावर केला होता. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याच ट्विटचा संदर्भ देत त्यांनी आता आणखी एक फोटो शेअर केला आहे. या शूजचा फोटो शेअर करताना त्यांनी, आता खाण्यायोग्य आणि टिकाऊ शूज बाजारात आल्याचं लिहिलं आहे.
हेही पाहा- पाण्याचा पंप बनवून केला जुगाड; व्हिडीओ पाहून म्हणाल कसा सुचला हा उपाय ?
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, “काही दिवसांपूर्वी आदिदासच्या एका भन्नाट देशी व्हर्जनचा फोटो मी पोस्ट केला होता. त्यावर मला काहींनी या ब्रँडचं ‘देशी’ नाव आणि डिझाईन कशी असावी याबाबत आयडियाज पाठवल्या. आमच्याकडे आता खाण्यायोग्य आणि पुनर्वापर करण्यायोग्य/टिकाऊ चप्पल, शूज आहेत. म्हणजे आता जॉगिंग नंतर नाश्त्याची पण सोय होईल. विचार करू शकतो.”
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ‘पुमा’च्या जागी उपमा आणि ‘आदिदास’च्या ऐवजी अजितदास असं लिहिलेले शूज पाहायला मिळत आहेत. जे पाहिल्यानंतर नेटकरी फोटोवर वेगवेगळ्या कमेंट देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “उपमा मेड इन इडली दिसत आहे.”
तर आणखी एकाने “आत्मनिर्भर भारत” असं लिहिलं आहे. तर आणखी एकाने “योगायोगाने आज आम्ही नाश्त्यासाठी उपमा घेतला होता” असं लिहिलं आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी हे खूप मजेशीर असल्याचं म्हटलं आहे.