सोशल मीडियावर बिहारमधील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ असे असतात ज्यामुळे बिहारमधील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. अशातच आता बिहारमधील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक सुरक्षा रक्षक बेडवर पडलेल्या रुग्णाला इंजेक्शन देताना दिसत आहे. त्यामुळे डॉक्टरांचं काम सुरक्षा रक्षकाला कसं जमू शकतं? असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी बिहार सरकार आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
रुग्णालयाचा हालगर्जीपणा आला समोर –
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कोणत्या रुग्णालयातील आहे याबाबतची कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. मात्र, तो बिहारचा असल्याचा दावा करत सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक रुग्ण बेडवर पडलेला आहे आणि सुरक्षा रक्षकाच्या वेशात एक वृद्ध व्यक्ती त्याला इंजेक्शन देताना दिसत आहे.
व्हिडिओंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, “अभिनंदन बिहार, तेजस्वी यादव जी यांनी सुरक्षा रक्षकाला डॉक्टर बनवलं आहे.” तर दुसर्याने लिहिलं, “जातीच्या जनगणनेनंतर सर्व काही ठीक होईल. बिहारमधील उत्कृष्ट आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी देश-विदेशातील लोक येणार आहेत.” KushagraAvinash नावाच्या वापरकर्त्याने लिहिलं की, बिहारमध्ये कोणतेही सरकार असो, परिस्थिती तशीच राहते. तर आणखी एका नेटकऱ्याने राजकारण्यांना प्रश्न विचारला आहे की, तुम्हाला राजकारण करण्यापासून वेळ मिळाला, तर तुम्ही इकडे लक्ष देऊ शकता का?