आजकाल प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करुन ठेवण्याची सवय लागली आहे. त्यामुळे अनेकजण मित्रांबरोबर पार्टी करतानाचे असो वा बाहेर फिरायला गेल्याचे असो, प्रत्येक ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. शिवाय आजकाल प्री-वेडिंग फोटोशूट, बेबी बंप फोटोशूट, अशा अनेक प्रकारचं फोटोशूट केलं जातं, शिवाय फोटोशूट करताना एक विशिष्ट प्रकारची थीम देखील ठेवली जाते. परंतु एका महिलेने तिच्या प्रेग्नन्सी फोटोशूटसाठी एक विचित्र थीम ठेवली आहे, ज्याची तुम्ही कल्पनादेखील करु शकत नाही.
फोटोशूट करताना आनंदाचा प्रसंग असेल तर त्या पद्धतीची थीमही ठेवली जाते. पण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्यासाठी लोक काहीही करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर ट्रोल होतात. असाच काहीसा प्रकार या महिलेबरोबर घडला आहे. कारण तिचे प्रेग्नेंसी फोटोशूट करताना चक्क ‘अंत्यसंस्कार’ थीम ठेवली होती. त्यामुळे ही महिला आता चांगलीच ट्रोल झाली आहे, शिवाय अनेक नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत, तर काही लोक मजेशीर कमेंट करत तिचे अभिनंदनही करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पाहा फोटो –
https://www.loksa.in/iBvXYo
हे फोटोशूट अमेरिकेत राहणाऱ्या २३ वर्षीय चेरिडन लॉग्सडन नावाच्या महिलेने केलं आहे. नुकतेच तिने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. यावेळी अंत्यसंस्काराची थीम ठेवत तिने काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये फोटोशूट केलं. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, चेरिडन लॉग्सडन म्हणाली, “मुले नाहीत त्यासाठी R.I.P!’ याचा अर्थ आता त्यांना मूल होणार आहेत. मूल न होण्याची परिस्थिती आता संपल्यामुळे R.I.P असं लिहिलं आहे.” लॉग्सडन तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण करणार असून तिला अनोख्या पद्धतीने फोटोशूट करायचे होते. तिने तिच्या फेसबुकवर सांगितले, “मी आता आई बनणार आहे.” फोटोंमध्ये ती डोळे पुसतानाही दिसत आहे.
या महिलेने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, “विनोद बाजूला ठेवून, मी माझ्या आयुष्याची नवी सुरूवात करण्यासाठी खूप उत्साहित आहे. अजूनही विश्वास बसत नाही पण हे खरे आहे.” ही पोस्ट अपलोट करताच काही वेळात ती व्हायरल झाली असून ती आतापर्यंत १४ हजारांहून अधिक लोकांनी ती लाईक केली आहे तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.