ख्रिसमसची धामधून सर्वत्र जोरदार सुरु आहे. घरोघरी ख्रिसमसचे देखावे तयार करण्यात आले आहेत. शिवाय ख्रिसमस वाईब सर्वत्र सुरु झाल्याचं आपणाला पाहायला मिळत आहे. अनेकजण आपाल्या जवळच्या व्यक्तींना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी ख्रिसमस कार्ड तयार केली आहेत. मात्र, सध्या एका अनोख्या ख्रिसमस कार्डची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. त्याची चर्चा होण्यामागे कारणदेखील तसंच भन्नाट आहे. कारण एका व्यक्तीने ख्रिसमस कार्डवर आपल्या शेजाऱ्याच्या दातांचा एक्स-रे छापाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कॅलिफोर्नियातील असून एका माणसाने चुकून त्याच्या शेजाऱ्याच्या दातांचा एक्स-रे ख्रिसमस कार्डवर छापला आहे. या कार्डचा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलं आही की, चुकीचा फोटो निवडून मी ९० ख्रिसमस कार्ड छापली आहेत. शिवाय या कार्डवर “मेरी ख्रिसमस: द व्हाईट्स” असं लिहिले होतं.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, कार्ड छापलेली व्यक्तीचं नावं डैन व्हाईट असून तो फोटो प्रिंटींग अॅप्लिकेशन शटरफ्लायचा वापर करुन कार्ड डिझाइन करत होता. हे अॅप्लिकेशन ग्राहकांना त्यांच्या कॅमेरा रोलमधून फोटो निवडण्याची आणि मजकूर आणि क्लिप आर्ट घालण्याची परवानगी देतं. त्यानुसार व्हाईट कार्ड बनवत होता. मात्र चुकून त्याने ख्रिसमस कार्ड बनवताना आपल्या कॅमेरा रोलमध्ये असणारा शेजाऱ्याच्या दातांच्या एक्स-रेचा फोटो निवडला. शिवाय त्याला त्याची चूक कार्ड छापल्यानंतर लक्षात आली मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
त्यामुळे हे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी कार्डवर गमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. महत्वाचं म्हणजे या घटनेची माहिती स्वत: डैन व्हाईटने ट्विटरवर दिली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘माझ्या कॅमेरा रोलमधून चुकीचा फोटो निवडला त्यामुळे आता माझ्याकडे यापैकी ९० कार्ड आहेत.’ शिवाय डैनने त्याने छापलेला चुकीचा फोटोदेखील ट्विट केला आहे. नंतरच्या ट्विटमध्ये, व्हाइटने माइकच्या दातांच्या एक्स-रेचा फोटो फोनमध्ये ठेवल्याचं कारण सांगितलं आहे. त्याने ट्विटमध्ये सांगितलं की, ‘माइकचे दात खूप मोठे असून ते दात माझ्या दंतचिकित्सकाला दाखवायचे आहेत.’
व्हायरल होत असलेल्या या फोटोला एक लाखाहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. एका वापरकर्त्याने या ट्विटवर कमेंट करताना लिहिलं आहे की, “सांता फ्लॉस,” तर दुसर्या वापरकर्त्याने, हे दात हिरव्या रंगामध्ये रंगवण्याचा सल्ला दिला आहे. तर आणखी तिसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ‘डैन. तुम्ही या दातांना हिरवा रंग दिला असता तर ते ख्रिसमस ट्रीसारखे दिसले असते’. तर आणखी एका वापरकर्त्याने लिहिलं आहे की डैन व्हाइटचे हे ख्रिसमस कार्ड अनेकांच्या लक्षात राहणार आहे कारण, ‘कोणी फुलांची कार्ड देतं कोणी आकर्षक चित्र असणारी कार्ड गिफ्ट देतात मात्र, दातांचा फोटो असणारं कार्ड हे डैनने दिलं होतं असं लोक म्हणतील.’