तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्हाला उत्तर प्रदेशातील एसडीएम ज्योती मौर्य कोण आहे हे सांगण्याती गरज नाही. हो कारण सध्या ज्योती मोर्य यांची सोशल मीडियावर एखाद्या सेलिब्रिटीपेक्षाही जास्त चर्चा सुरु आहे. त्यांच्याशी संबंधित मिम्सचा तर अक्षरश: महापूर आला आहे. शिवाय या महिलेच्या एका कृतीमुळे अनेक पती आपल्या पत्नीला लग्नानंतर शिक्षणापासून दूर ठेवत असल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. सध्या ज्योती मौर्य आणि त्यांचा पती आलोक यांच्यातील वाद सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय ठरला आहे. पती-पत्नीच्या नात्यामधील विश्वासार्हता ज्योतीने गमावल्याचा आरोप पती आलोक याने केला आहे. शिवाय मोठ्या पदावर गेल्यानंतर ज्योतीने आपल्याला धोका दिल्याचंही आलोकने म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर मीडियासोबत व्हॉट्सअ‍ॅप चॅट शेअर करत आलोकने ज्योतीचे दुसऱ्या अधिकाऱ्याबरोबर अफेअर सुरु असल्याचे पुरावेदेखील दिले आहेत. त्यामुळे सध्या नेटकरी आलोकबद्दल सहानुभूती दाखवत आहेत, तर ज्योती यांच्यावर नवऱ्याला धोका दिल्याचा आरोप करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही पाहा- ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत केदारनाथ मंदिर समितीच्या तक्रारीनंतर पोलिसांचा मोठा निर्णय; शूटिंग करणाऱ्यांना दिला इशारा, म्हणाले…

दरम्यान, एसडीएम ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक यांच्यातील वाद आता कोर्टात पोहोचला आहे. पण दोघांमध्ये सुरू असलेल्या या प्रकरणाचा इतका परिणाम झाला आहे की, काही नवऱ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पत्नींचा अभ्यास बंद केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान आता ज्योती मौर्यने आजतकशी बोलताना आपल्या नवऱ्याला आणि नेटकऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ज्योती म्हणाली, “मी एवढेच सांगेन की, ही माझी वैयक्तिक बाब असून मला ती सार्वजनिक किंवा सोशल मीडियावर घेऊन जायची नाही. मी कायदेशीर मार्गाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू असून माझी भूमिका तीच आहे. शिवाय मी ज्या पदावर आहे तिथून मी महिलांसाठी बोलते आणि कामही करते” शिवाय महिलांना शिक्षण घेण्यापासून कोणीही रोखू नका, शिक्षण घेणं हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे असं आवाहनदेखील त्यांनी लोकांना केलं आहे.

हेही वाचा- अधिकारी झाल्यावर तिने नवऱ्याला सोडणं बरोबर की चुकीचं?

अफेअरच्या आरोपावर काय म्हणाली ज्योती?

अफेअरच्या आरोपांबाबत ज्योतीला प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, ही तिची वैयक्तिक बाब आहे. आणि कोर्टात केस चालू आहे. आलोकने २०१० पासून सहकार्य केलं नाही? या प्रश्नावर ती म्हणाली, “मी तसे म्हटलेलं नाही, ही पती-पत्नीमधील वैयक्तिक बाब आहे. तसेच आलोकने हे सर्व आरोप करण्यापुर्वीपासून हे प्रकरण कोर्टात आहे. आलोक काय बोलतोय ते त्याला बोलुद्या, मला काही स्टोरी सांगायची नाही.”

नवऱ्याने शिक्षणासाठी मदत केली का?

आलोकने ज्योतीला शिक्षणासाठी खूप मदत केली, ती अधिकारी बनवण्यामागे तिच्या पतीचा खूप मोठा वाटा आहे, अशा सततच्या बातम्यांवर ज्योती यांनी पतीला आणि नेटकऱ्यांना टोमणा मारला. त्या म्हणाल्या, “तुम्हाला माहिती आहे, आलोकने मला लहानपणापासूनच वाढवलं, मी एलकेजीमध्ये असताना माझे लग्न झाले आहे.” शिक्षणासाठी पतीने मदत केल्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, नवरा बायकोच्या नात्यात दोघेही एकमेकांना मदत करतात हे उघड आहे. पण मदत केल्याचा अर्थ असा नाही की, एखादी व्यक्ती मोठ्या पदावर गेल्यावर तुम्ही त्याला सतत टोमणे मारत राहणार किंवा तिचा रोज मानसिक छळ करणार.

नेटकऱ्यांना काय दिलं उत्तर?

सोशल मीडिया ट्रोलिंगवर बोलताना ज्योती मौर्या म्हणाल्या, “माझा सोशल मीडियाशी काहीही संबंध नाही. तुम्हाला जे शेअर करायचे आहे ते करा. या वादाबाबतचा खटला न्यायालयात आधीपासून सुरू आहे. त्यामुळे मला जे सांगायचे आहे ते मी कोर्टात सांगेन.” पतीबरोबरचे नाते तुटण्याच्या प्रश्नावर तिने सांगितले की, मी वेगळं होण्यासाठी कायदेशीर मार्ग निवडला होता, पण आलोकने सोशल मीडियावर आणून आमचे १२ वर्षांचे नाते आणखी बिघडवले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending sdm jyoti mauryas taunt on husband alok gave this message to those who called back their wives jap