साप लहान असो वा मोठा, त्याला पाहताच लोकांची अवस्था वाईट होते. दिसणं तर लांब राहिलं, फक्त सापाचं नाव जरी घेतलं तरी भल्या भल्या माणसाचा थरकाप उडतो. कल्पना करा की जर प्रत्यक्षात खतरनाक साप तुमच्या समोर आला तर? त्याला पाहून तुम्ही धूम ठोकाल हे मात्र नक्की. मात्र, सध्या सोशल मीडियावर सापाच जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो काहीसा वेगळा आहे. आतापर्यंत तुम्ही सापाला दूध पिताना पाहिलं असेल, तर सापाला कधी पाणी पाजताना पाहिलंय का? ते ही ओंजळीने…होय, हे खरंय. यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस तहानलेल्या सापाला आपल्या हाताने ओंजळीत पाणी पाजताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सापाला आपल्या ओंजळीने पाणी पाजत असताना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती दिसून आली नाही. याहूनही विशेष म्हणजे ओंजळीतून पाणी पित असताना सापही त्या व्यक्तीवर हल्ला करत नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्ये साप ज्या पद्धतीने गटागटा पाणी पितो, ते पाहून तो साप तहानलेला असावा, असं वाटू लागतं. साप एका व्यक्तीच्या ओंजळीतून पाणी कसा काय पिऊ शकतो, असा प्रश्न प्रत्येकजण करताना दिसून येत आहे. आतापर्यंत सापाला दूध पिताना अनेकांनी पाहिलंय, पण पाणी पित असताना सापाला पहिल्यांदाच पाहिल्याची भावना काही युजर्सनी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण अवाक होत आहे.

हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. “उन्हाळा येत आहे. तुम्ही दिलेले पाण्याचे काही थेंब एखाद्याचे प्राण वाचवू शकतात. तुमच्या बागेत पाण्याने भरलेले भांडे ठेवा, जेणेकरून कोणताही तहानलेला प्राणी किंवा पक्षी त्यातून आपली तहान भागवू शकेल.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. एखाद्या पाळीव प्राण्याला ज्याप्रमाणे वागणूक दिली जाते अगदी त्याचप्रमाणे आश्चर्यकारक वागणूक या सापाला देत असल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून हा साप त्या व्यक्तीचा पाळीव साप असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा : ही खरी माणूसकी! हा VIRAL VIDEO पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : डोक्यावरच्या पदरात चेहरा लपलेला, पण तरीही या लेकाने त्याच्या आईला ओळखलंच… पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १४.९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक युजर्सनी या व्हिडीओला लाईक करत आपल्या भावना कमेंट्स सेक्शनमध्ये शेअर केल्या आहेत.

एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, कृपया कॅप्शनमध्ये असेही नमूद करा की, तुमच्या बागेत सापांशी अजिबात अशा पद्धतीने व्यवहार करू नका, अन्यथा अप्रिय घटनाही घडू शकतात. त्याचप्रमाणे आणखी एका युजरनेही सल्ला दिला असून साप कधीही तुमचा मित्र होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे.