सध्याच्या डिजीटल जमान्यात प्रत्येक गोष्ट काही क्षणात गुगलवर उपलब्ध होते. तुम्हाला कुठे जायचं असेल आणि तो रस्ता माहिती नसेल तर तुम्ही गुगल मॅप वापरता. प्रवासादरम्यान गाडी खराब झाली तर एखाद्या मेकॅनिकला तुम्ही गुगलद्वारे बोलावता. शिवाय एखाद्या नवीन शहरामध्ये रुम शोधण्यापासून ते चांगलं जेवणं कुठे मिळेल याबाबतची अनेक माहिती तुम्हाला गुगलकडून काही क्षणात मिळते. परंतु टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली तरीही भारतीयांच्या काही प्रश्नांपुढे तिने हार मानल्याचं आपण पाहिलं आहे. कारण आपल्या देशातील अनेक बहाद्दर गुगलवर काय सर्च करतील याचा नेम नाही.
सध्या अशाच एका आजोबांनी गुगलची बोलती बंद केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कदाचित हे वाचून तुम्हाला धक्का बसेल मात्र हे खरं आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रश्नांची उत्तरे देणारे गुगलने या आजोबांसमोर हात टेकले आहेत. शिवाय हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.
व्हायरल होत असणाऱ्या आजोबांचा हा व्हिडीओ Amit atri नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतील आजोबा गुगलला प्रश्न विचारताना आधी गुलगुल असं चुकीचं नाव घेतात. तर चुकीचं नाव घेतलं म्हणून ते गुगलची माफीदेखील मागतात आणि गुगला असा प्रश्न विचारतात ज्याचं उत्तर गुगलला देणं अशक्य झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
जाणून घ्या तो प्रश्न –
या व्हिडीओतील आजोबा गुगलला त्यांच्या परिसरात भंडारा कुठे आहे का? ज्यामध्ये खाण्यासाठी रायता मिळेल, असा प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या या अनोख्या प्रश्नामुळे नेटकऱ्यांना त्यांचं हसू आवरणं कठीण झालं आहे. शिवाय हा व्हिडीओ आत्तापर्यंत ३.८ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओ खाली अनेक मनोरंजक कमेंट नेटकरी करत आहेत. एका नेटकऱ्याने गुगल या प्रश्नाचे कधीच उत्तर देऊ शकणार नाही असं म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने गुगलचा हा चुकीचा वापर असल्याचं म्हटलं आहे.