आजपर्यंत लहान भावंडे म्हणजे भांडखोर, एकमेकांना मारणारी किंवा खाऊसाठी रडणारी आपण पाहिली असतील. भाऊ-बहिणीमध्ये सतत किरकोळ कारणावरुन अनेक भांडणही होत असतात. मात्र, भाऊ-बहिणीमध्ये कितीही वाद असले तरीदेखील त्यांच्या नात्यामधील प्रेम हे सर्व नात्यांपेक्षा मोठं असतं. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आपुलकी आणि जबाबदारी दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये एक बहिण भावासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देण्यासही तयार झाल्याचं दिसतं आहे.
या व्हिडीओत एक मुलगी रस्त्यावर उभी असताना तिच्यासोबत तिची दोन भावंडेही तिथे उभी असल्याचं दिसतं आहे. हे तिघे बाहेर उभे असताना त्या रस्त्यावर एक क्रेन मागे येताना दिसतं आहे. ती क्रेन मागे येत असल्यामुळे आपली भांवडे त्याखाली सापडतील या भितीने ती लहान मुलगी ताबडतोब तिच्या भावंडाना मागे ओढते आणि त्यांना वाचवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध हात पसरून उभी राहते. ज्यावेळी ती चक्क क्रेन आणि भावंडामधील सुरक्षाभिंत झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
हा व्हिडिओ @Yoda4ever नावाच्या अकाऊंटद्वारे ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तीन भावंड बांधकाम साइटवर उभे असल्याचे दिसत आहे. यावेळ बांधकामच्या साइटवर असणारी एक क्रेन पुढे येताच लहान मुलगी मोठी बहीण म्हणून आपली जबाबदारी स्विकारताना दिसतं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये ‘लहान मुलगी मोठ्या बहिणीची जबाबदारी गांभीर्याने घेताना.’ असं लिहलं आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. शिवाय अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ‘एवढ्या लहान मुलीने आपल्या भावंडांना सुरक्षित ठेवलं आहे. या चिमुरडीला आपल्या भावंडाना कसं जपायचे हे माहीत आहे.’ तसंच दुसऱ्या एकाने म्हटलं आहे की, ‘ती एक सक्षम बहीण आहे, ती आपल्या भावाची खूप गांभीर्याने काळजी घेते.’