सध्याच्या काळात मोबाईलशिवाय जगणं खूप कठीण झालं आहे, कारण मोबाईल आता आपल्या जीवनातील एक अत्यावश्यक भाग बनला आहे. कारण लहान मुलांचा अभ्यास असो वा ऑफिसमधील महत्वाची कामं मोबाईलवरुन सहजरित्या करता येतात. शिवाय मोबाईलमध्ये आपल्या अनेक आठवणी, महत्वाच्या गोष्टीदेखील असतात. त्यामुळे जर आपण वापरत असलेला मोबाईल चोरीला गेला तर आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार येतात. ज्यामध्ये आपला महत्वाचा डेटा लीक होण्याची भीती देखील मोठ्या प्रमाणात सतावते. अनेकजण चोरीला गेलेला फोन मिळेल या आशेवर राहतात, तर काहीजण गेलेला मोबाईल परत मिळणारच नाही असं गृहीत धरुन त्याचा शोध घेणं बंद करतात.
परंतु आता तुमचा फोन चोरीला गेला तरी काळजी करण्याचं कारण नाही. हो कारण सध्या एका आयपीएस अधिकाऱ्याने ट्विटरवर असा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी चोरीला गेलेला मोबाईल तो चोरणाऱ्याला देखील वापरता येणार नाही, यासाठी काय करावं लागेल याची माहिती सांगितली आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या ४५ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी अशोक कुमार सांगत आहेत की, व्हिडीओमध्ये सांगितलेली पद्धत वापरून तुम्ही तुमचा चोरीला गेलेला फोन परत मिळवू शकता.
हेही वाचा- कार सुरू करताच AC चालू करायचा की ठराविक वेळेनंतर? कारच्या दृष्टीने योग्य पद्धत कोणती जाणून घ्या
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मोबाइल हरवला आहे, काळजी करू नका. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्ही पोलिसांकडे जाऊ शकत नसाल तर या माहितीचा तुम्हाला खूप उपयोग होईल. चोरीची तक्रार करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची तक्रार नोंदवा. यामुळे चोर तुमचा मोबाईल वापरू शकणार नाही आणि त्याच्याकडे तुमचा परत करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरणार नाही.
व्हिडिओमध्ये चोरीला गेलेला मोबाईल कसा ब्लॉक करायचा? याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शिवाय मोबाईल शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलची सर्व माहिती ऑनलाईन सबमिट करणं गरजेचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाइल ब्लॉक करण्याचा पर्याय निवडता येईल, त्यानंतर एक फॉर्म उघडेल, ज्यामध्ये विचारलेली माहिती भरावी लागेल, तुम्ही योग्य पद्धतीने सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा मोबाईल बंद केला जाईल. ज्यामुळे तो चोरण्याऱ्या व्यक्तीला त्याचा गैरवापर करता येणार नाही.
IPS अधिकाऱ्यांनी शेअर केलेला व्हिडीओ अनेक लोकांच्या कामी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही लोक कमेंट बॉक्समध्ये संताप व्यक्त करत आहेत, तक्रार करूनही काहीच होत नसल्याचा दावा ते करत आहेत. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, “माहिती चांगली आहे पण सामान्य माणसाचा मोबाईल कधीच परत केला जात नाही. हे कटू सत्य आहे.” तर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. आतापर्यंत ७ लाख ६० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर १० हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.