मागील काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत खूप वाढ झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे दिल्लीतील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर डीडीएमएची बैठक घेण्यात आली. दिल्लीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना रविवारपर्यंत सुट्टीदेखील त्यांनी जाहीर केली आहे. शिवाय जलशुद्धीकरण केंद्र बंद पडल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत होणार आहे. शिवाय दिल्लीसह उत्तराखंडमधील पुराचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडीओ मजेशीर आहेत तर काही अंगावर शहारा आणणारे आहेत. अशातच आता दिल्लीच्या रस्त्यावरील असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोकांनी प्रशासनावर टीका करायला सुरुवात केली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालक छातीपर्यंत पाण्यात बुडाल्याचं दिसत आहे. पाण्यातून रिक्षा ओढणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संपुर्ण रस्ता पाण्यात बुडाल्याचं दिसत आहे. मात्र एवढ्या पाण्यातही हा व्यक्ती रिक्षा ओढताना दिसत आहे. शिवाय जोरदार पावसानंतर दिल्लीत निर्माण झालेल्या पुराच्या परिस्थितीवरुन नेटकरी सोशल मीडियावर प्रशासनापर टीका करत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
पाण्यात बुडून रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, “सर्वात आशावादी व्यक्ती, जो प्रवासी मिळवण्याचा विचार करत आहे पण दुर्दैवाने त्याला मीडिया कव्हरेज मिळाले.” शिवम मिश्रा यांनी लिहिले, “अभिनंदन! दिल्लीच्या लोकांनो, केजरीवालजींनी संपूर्ण दिल्लीला स्विमिंग पूल बनवले आहे.” दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी पुराच्या परिस्थितीवर म्हटलं आहे की, विकासकामांसाठी आलेला पैसा प्रचारात खर्च केल्याने दिल्ली पुरात वाहून गेली. मी सतत मदतकार्यावर लक्ष ठेवून आहे तसेच सर्व पीडितांपर्यंत अन्न पोहोचवले जाईल’