सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. कधी कोणी मेट्रोत टॉवेलवरती येतो तर कोणी बाईकवर जीवघेणे स्टंट करतो. अशातच मागील काही दिवसांपासून केदारनाथमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी केदारनाथ मंदिराजवळ मोबाईल वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. अशातच आता केदारनाथ मंदिरासमोरच एका मुलीने तिच्या जोडीदाराला प्रपोज केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे केदारनाथ मंदिराच्या दिशेने हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. यावेळी तरुणी मागून एका कॅमेरामॅनला हाताच्या इशाऱ्याने बोलावून घेते. तो व्यक्ती पुढे येतो आणि तिच्या प्रियकराला कळू न देता तिच्या हातात अंगठी ठेवतो. यावेळी मुलगी हातात अंगठी घेऊन गुडघ्यावर बसते आणि जोडीदाराला प्रपोज करते. यावेळी समोरचा मुलगा आश्चर्यचकित होतो आणि मुलगी त्याला अंगठी घालते. यानंतर ते दोघे एकमेकांना मिठीही मारतात.
नेटकरी म्हणतायत, “ओवरअॅक्टींग” –
सोशल मीडियावर या व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काही लोकांनी धार्मिक स्थळांवर असले प्रकार करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तर काही लोकांनी हा व्हिडीओ सुंदर असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने हे सर्व स्क्रिप्टेड असून केवळ व्हायरल होण्यासाठी हा व्हिडीओ तयार केल्याचं म्हटलं आहे.
बहुतांश लोकांनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. शिवाय आता केदारनाथ मंदिराच्या परिसरात मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी घालावी अशी ते मागणी करत आहेत. यापूर्वीही एकदा असाच एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एक माणूस आपल्या कुत्र्याला पाठीवर घेऊन केदारनाथ धामला पोहोचला होता आणि त्याने आपल्या कुत्र्यासोबत देवाच्या चरणांना स्पर्शही केला होता. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही बराच वाद झाला होता.