Who is Trishla Chaturvedi : युट्यूब आणि इंटरनेटवर सध्या पॉडकास्टचं चांगलंच पेव फुटलंय. अनेकजण स्वतःचं पॉडकास्ट सुरू करतात आणि मुलाखती घेत फिरतात. या मुलाखतींमधील काही प्रसंगाचे शॉर्ट व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात किंवा मुलाखत घेणारेच असे शॉर्ट व्हिडीओ व्हायरल करत असतात. सध्या एक्सवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओतील महिला ज्यांचे नाव त्रिशला चतुर्वेदी आहे, त्या सांगतात की, त्यांच्या कुटुंबाने ४५ दिवस पंचगव्य आहार केला. पंचगव्य म्हणजे गोमूत्र, गाईचे शेण, दूध, तूप, दही यापासून बनविलेला रस. हे पंचगव्य घेण्यामागे कारण काय होते? कारण ऐकाल तर डोक्याला हात मारून घ्याल.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
त्रिशला चतुर्वेदी नामक महिला जयपूरमधील असून त्या स्वतःला ज्योतिषी असल्याचे सांगतात. या व्हिडीओमध्ये त्या म्हणतात की, आम्ही कुटुंबासह जगन्नाथ पुरी मंदिरात गेलो होतो. मंदिरातून परतल्यानंतर गाडीची वाट पाहत असताना एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी गेलो. तिथे आम्ही जेवण मागवणारच, तेवढ्यात आमच्या मागच्या टेबलवर बसलेल्या एका व्यक्तीने बिर्याणीची ऑर्डर दिली. ती नॉन व्हेज बिर्याणी होती. हे कळल्यानंतर आम्हाला धक्का बसला. त्या हॉटेलमध्ये आमची घुसमट होऊ लागली. आम्ही सर्व तात्काळ तिथून बाहेर आलो, मोकळ्या हवेत आल्यानंतर आम्हाला थोडं हायसं वाटलं.
हे वाचा >> नॉन व्हेज आणलं म्हणून स्टुडिओबाहेर काढलं अन्…, ‘या’ अभिनेत्याला मिळाली होती वाईट वागणूक, म्हणाला…
त्रिशला चतुर्वेदी आणि त्यांचे कुटुंबीय एवढ्यावरच थांबले नाहीत. त्रिशला पुढे म्हणाल्या की, आम्ही घरी न परतता तसेच हरिद्वारला गेलो. तिथून पुढचे ४५ दिवस आम्ही फक्त पंचगव्य आहार घेतला. आम्ही त्या हॉटेलमध्ये बसून चूक केली होती. त्यामुळे हा आहार घेतला. ४५ दिवस आमच्या घरात इतर कोणतेही जेवण बनले नाही. मुलाखतकारांनी पंचगव्य बद्दल विचारताच, त्याचेही स्पष्टीकरण त्या देतात. त्या म्हणाल्या,गोमूत्र आणि गाईचे शेण यांचे मिश्रण करून हा पदार्थ तयार करतात.
रिअल हिट या पॉ़डकास्ट चॅनेलला त्रिशला यांनी ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा हा तुकडा सध्या जोरदार व्हायरल होत असून शाकाहारी- मांसाहारी लोक यावर भिडले आहेत. अनेकांनी त्रिशला यांच्यावर टीका केल्याचे दिसून येते.
हे वाचा >> आयुर्उपचार : गो-विज्ञान आणि आयुर्वेद
त्रिशला चतुर्वेदी कोण आहेत? (Who is Trishla Chaturvedi)
माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, त्रिशला चतुर्वेदी या जयपूरमधील ज्योतिषी आहेत. त्यांच्याकडे फलज्योतिष विद्येची पीएचडी असल्याचे सांगितले जाते. त्यांचे स्वतःचे युट्यूब चॅनेलही आहे. त्यावर जवळपास एक दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या ज्योतिष, वास्तूशास्त्र, भविष्य अशा विषयांवर लोकांना मार्गदर्शन करतात.