Truck Drivers Strike : ‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी सोमवारीपासून निदर्शने सुरू केली. केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरु आहे. ट्रकचालक संपाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरही होत आहे. अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका, स्कूल बस तसेच सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होत आहे. कालपर्यंत पुणे शहर,पिंपरी चिंचवड,ग्रामीण भागातील पेट्रोल-डिझेल पंपावर असलेली तुरळक गर्दी आज मुंबईतही पाहायला मिळाली. काही ठिकाणी तर पेट्रोल न मिळण्याच्या शंकेने पेट्रोल भरण्यासाठी पंपावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान अशीच गर्दी मुंबईतील बोरिवली पूर्वेला असणाऱ्या एका पेट्रोल पंपावर दिसली. या गर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ बोरिवली टाटा पॉवर कॉलनीजवळच्या पेट्रोल पंपाबाहेरील असल्याचं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पेट्रोल पंपाबाहेर वाहनांची लांबच लांब रांग लागलेली आहे. काही पेट्रोल पंपांपर्यंत ट्रक पोहोचू न शकल्याने अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन संपलं आहे. तर, काही ठिकणी संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या आहेत.
@borivalimumbaikar47 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Indian Railway : तिकीट बुकिंग ते ट्रेन ट्रॅकिंग आता एकाच अॅपवर! मिळणार रेल्वेबाबतची A to Z माहिती, वाचा सविस्तर
इंधन टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. कल्याण डोंबिवलीतील बहुतांश पेट्रोल पंप दुपारी बंद करण्यात आले. यामुळे एखाद दुसऱ्या चालू पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांनी रांगाच रांगा लावल्या होत्या.
दरम्यान आता महाराष्ट्र राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पोलिसांना आदेश दिले आहेत. गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पोलिसांनी आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.