तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असे नेहमीच म्हटले जाते. याचा प्रत्यक्षात अनुभव सारु मुंशी खान या मुळच्या खांडवाच्या तरुणाला आला. १९८६ मध्ये कुटुंबापासून दुरावलेल्या सारु खानने चक्क गुगल अर्थद्वारे स्वतःच्या कुटुंबाचा शोध घेतला आहे.
मध्यप्रदेशमधील खांडव्यात राहणारा सारु मुंशी खान हा १९८६ मध्ये त्याचा भाऊ गुड्डूसोबत खांडवा स्टेशनवर आला होता. सारुची आई बांधकाम साईटवर मजुरीची कामे करायची. पतीने साथ सोडल्याने सारुच्या आईवर तीन मुलं आणि एका मुलीची जबाबदारी होती. आईला साथ देण्यासाठी गुड्डू हा दररोज रेल्वेत फिरुन खाली पडलेली नाणी गोळा करायचा. १९८६ मध्ये सारुदेखील गुड्डूसोबत स्टेशनवर गेला होता. झोप आवरता न आल्याने सारु फलाटावरील बाकड्यांवरच झोपी गेला. काही वेळाने तो उठला खरा मात्र भाऊ गुड्डू त्याला बाजूला दिसला नाही. भाऊ गाडीत असेल या आशेने पाच वर्ष सारु गाडीत चढला आणि पुन्हा एकदा झोपी गेला. सारुने डोळे उघडले तेव्हा खिडकीबाहेर निर्जन परिसर दिसत होता. परिसर अनोळखी वाटल्याने सारु घाबरला. त्याने भावाचा शोधही घेतला पण त्याला शेवटपर्यंत गुड्डू भेटलाच नाही. शेवटी गाडी पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशनवर पोहोचली. हावडा स्टेशनवर सारुने लोकांची मदत मागितली. पण त्यावेळी कोणालाच हिंदी कळत नसल्याने सारुला मदत करायला कोणीही तयार होत नव्हते. अखेर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आणि हरवलेला मुलगा अशी नोंद करत पोलिसांनी त्याची रवानगी अनाथ आश्रमात केली. अनाथ आश्रमात ऑस्ट्रेलियातून आलेल्या ब्रायर्ली दाम्पत्याने सारुला दत्तक घेतले.
इंग्रजीची तोंड ओळख नसलेला सारु आता थेट ऑस्ट्रेलियात पोहोचला होता. सुरुवातीला ब्रायर्ली दाम्पत्याला सारुशी संवाद साधण्यात अडचणी आल्या. शेजारी राहणा-या एका भारतीय दाम्पत्याच्या मदतीने ब्रायर्ली दाम्पत्य सारुशी संवाद साधू लागले. कुटुंबाशी झालेला विरह सारु आता हळहळू ऑस्ट्रेलियात रमू लागला. ब्रायर्ली दाम्पत्याने सारुला उत्तम शिक्षण दिले. त्याला समुद्रात पोहायला देखील शिकवले. पण मनात असलेली भारताची ओढ सारुला स्वस्त बसू देईना. शेवटी त्याने २०१० मध्ये गुगल अर्थवर स्वतःच गाव शोधून काढण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियात राहून सारुला हिंदीचा विसर पडला होता. गुगल अर्थवर गावाची नावं बघून त्याच्या गोंधळात भर पडली. शेवटी त्याने कोलकात्यावरुन १२ ट्रेनने कुठे जाता येते याचा शोध घेतला. या दरम्यान त्याला खांडवा सापडले आणि सारुला त्याच्या गावाचे नाव लक्षात आले. खांडव्यात आपल्या आईचा शोध घेण्यासाठी सारुने मग फेसबुकचा आधार घेतला. खांडव्यातील एका ग्रुपच्या मदतीने त्याला आपल्या आईचा पत्ता सापडला आणि मग सारुने विमानाने थेट खांडवा गाठले.
गावात सारुने तब्बल ११ दिवस मुक्काम केला. मायलेकाची तब्बल २५ वर्षांनी भेट झाली तेव्हा उपस्थित मंडळीही भावूक झाली. सारु बेपत्ता झाल्याच्या काही दिवसांनी गुड्डूचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळल्याचे त्याच्या आईने त्याला सांगितले. गुड्डूचा मृत्यू कसा झाला हे मात्र स्पष्ट झाले नाही असंही त्यांनी सांगितले. सारुच्या या प्रवासावर हॉलीवूडलाही भूरळ पडली आहे. सारुच्या आयुष्यावर लायन हा चित्रपट काढण्यात आला असून स्लमडॉग मिलेनियर फेम देव पटेल, निकोल किडमेन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे.
गुगल अर्थने घडवली कुटुंबाची भेट
१९८६ मध्ये कुटुंबापासून दुरावलेल्या सारु खानने चक्क गुगल अर्थद्वारे स्वतःच्या कुटुंबाचा शोध घेतला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 28-08-2016 at 16:30 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: True story of a boy who used google earth to find his long lost family