गेल्या आठवड्याभरापासून पिंज-यात कैद केलेल्या एका प्राण्याच्या फोटोमुळे केरळ कर्नाटकच्या गावांमध्ये भितीचे वातावरण आहे. हा प्राणी नसून तो परग्रहावरून आलेला एलियन आहे आणि त्यांने आतापर्यंत अनेक माणसांना, जंगली प्राण्यांना खाल्ले आहेत असे संदेश व्हॉट्स अॅप आणि इतर सोशल मीडियावर फिरत आहेत. या संदेशामुळे शेजारील गावांमध्ये भीती पसरली आहे. परंतु व्हायरल झालेल्या एलियनचे सत्य काही वेगळेच आहे.
वाचा : व्हायरल झालेली १००० ची नोट खरी की खोटी?
‘कर्नाटक- केरळ सीमेवर एका एलियनला पिंज-यात कैद केले असून त्याचे उर्वरित चार साथीदार एलियन्स फरार आहेत. त्यामुळे, गावक-यांनी सावध रहा’ असा व्हॉट्स अॅप संदेश या सीमेवर असणा-या गावांत फिरत आहे. त्यामुळे गावकरी चांगलेच घाबरून गेले आहे. ‘पोलिसांनी या एलियनला पकडले असून, तो जंगलातील प्राण्यांना तर खातोच पण माणसांना पण खातो.’ अशा एका संदेशाने गावक-यांमधली भिती आणखी वाढली आहे. या एलियनची व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे लोकांमधली भीती आणखी वाढली आहे. पण, या व्हायरल झालेल्या फोटोंचे सत्य काही वेगळेच आहे.
वाचा : व्हायरल झालेला हा फोटो भाजप नेत्याच्या मुलीचा नव्हे
गेल्याचवर्षी मलेशियामधली गावात एक अस्वल पकडण्यात आले होते. या अस्वलाचा हा फोटो आहे. रोगामुळे या अस्वलाच्या अंगावरील केस झडले आहेत. त्यामुळे तो विद्रुप दिसत होता. येथल्या लोकांनी देखील या प्राण्याला एलियन समजून त्याच्यावर दगड फेकले होते. पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी या प्राण्याला पकडून उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. त्यामुळे, व्हॉट्स अॅपवर फिरणा-या खोट्या संदेशावर विश्वास ठेवू नका, आधी घटनेची सत्यता पडताळा असे आवाहन गावक-यांना पोलिसांनी केले आहे.