गेल्या दोन महिन्यांपासून व्हॉट्स अॅपवर अनेक अफवांना पेव फुटले आहे. व्हॉट्स अॅपवरच्या संदेश आणि लिंकवर विश्वास न ठेवण्याच्या सुचना करूनही अनेकदा आपण चूक करून बसतो. गेल्या काही दिवसांपासून असाच एक संदेश मोठ्या प्रमाणात व्हॉट्स अॅपवर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक मोबाईल धारकाला ५०० रुपयांचे रिचार्ज मोफत देणार असल्याचा हा संदेश आहे. त्यासोबत लिंक देखील जोडण्यात आली आहे. यावर मोठ मोठ्या टेलिकॉम कंपनीची नावेही छापण्यात आली आहे. त्यामुळे मोहापायी अनेकजण या लिंकवर क्लिक करत आहेत. पण अशी चूक करणे महागातही पडू शकते. कारण हा संदेश पूर्णपणे खोटा असून अशी कोणतीही योजना पंतप्रधानांनी सुरू केली नाही. त्यामुळे अशा लिंकवर क्लिक केल्यास तुमची गोपनीय माहिती इतरांच्या हाती लागू शकते.
वाचा : नोटाबंदीनंतर ‘#मोदीजी_को_चौराहे_पर_सजा!’ हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये
५०० रुपयांचा मोबईल रिचार्ज हा संदेश व्हॉट्स अॅपवर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. मोदी सरकार प्रत्येक मोबाईल धारकांना ५०० रुपयांचा मोबाईल रिचार्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे या संदेशात म्हटले आहे. सोबत ‘http://balance.modi-gov.in/’ ही लिंकही दिली आहे. त्यामुळे लोक या लिंकवर क्लिक करून पाहत आहे. पण ही फेक लिंक असून यावर क्लिक केल्याने कोणताही रिचार्ज उपलब्ध होणार नाही. टाटा, एअरटेल, बीएसएनल, एमटीएनएल, एअरसेल अशा अनेक मोठमोठ्या टेलीकॉम कंपनीची नावे यावर दिली आहेत. पण याच बरोबर खाली नियम आणि अटींच्या रकान्यात आम्ही कोणताही रिचार्ज उपलब्ध करून देत नाही असेही लिहिले आहे. तेव्हा या केवळ अफवा आहेत असे संदेश पाठवून लोकांना मुर्खात काढले जात आहे. भारतात सर्वाधिक लोक व्हॉट्स अॅप वापरत आहेत त्यामुळे अशा अनेक अफवांना पेव फुटत आहे. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅप कॉलिंगचे निमंत्रणही असेच व्हायरल होत होते.