रामचरित मानस, हनुमान चालीसा व महाग्रंथ रामायणाचे अवधी भाषेत लिहिणाऱ्या तुलसीदास यांची ४ ऑगस्ट ला जयंती साजरी केली जाते. उत्तर भारतात हा दिवस सणाप्रमाणे साजरा होतो. तुलसीदासांचा जन्म चित्रकूट मधील राजापूर गावी आत्माराम दुबे व हुलसी यांच्या पोटी झाला होता. श्रावण शुक्ल सप्तमी या तिथीला १५५४ साली तुलसीदासांचा जन्म झाला यंदा ही तिथी ४ ऑगस्टला आहे. तुलसीदास यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक असे प्रसंग आहेत जे त्यांच्या अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाची साक्ष पटवून देतात. यातीलच काही निवडक प्रसंग आज आपण पाहणार आहोत..

असं म्हणतात तुलसीदास यांचा जन्मच चमत्कारिक रित्या झाला होता. इतर बाळांप्रमाणे ९ महिने नव्हे तर चक्क १२ महिने त्यांनी आईच्या गर्भात वास्तव्य केले. इतर नवजात शिशु जन्मतःच रडतात मात्र स्वामी तुलसीदास यांच्या जन्माच्या क्षणी त्यांच्या मुखातून राम नामाचा जप होत होता. इतकंच नव्हे तर जन्मतःच त्यांचे ३२ दात व भारी भक्कम शरीर पाहून सगळेच चक्रावले होते.

हे सर्व प्रकार अमंगळ मानून तुलसीदासांची आई हुलसी यांनी एका दासीला आपल्या बाळाला तिच्या सासरी घेऊन जाण्याचे आदेश दिले व दुसऱ्या दिवशी त्यांचे देहावसान झाले. पुढील पाच वर्षे या दासीने तुलसीदासांचा सांभाळ केला मात्र त्यानंतर या दासीचे सुद्धा निधन झाले व तुलसीदास पुन्हा अनाथ झाले. असं म्हणतात, की तुलसीदासांना दारोदारी भटकताना पाहिल्यावर स्वतः माता पार्वती रोज त्यांना जेवू घालण्यासाठी येत असे.

अयोध्येत माघ शुक्ल पंचमीला १५६१ मध्ये तुलसीदासांचा यज्ञोपवीत सोहळा पार पडला होता. स्वामी नरहर्यानंद हे तुलसीदासांचे गुरु ज्यांनी त्यांना रामबोला असे नाव दिले होते. गुरुमुखातून बाहेर येणारं प्रत्येक वाक्य रामबोला एकदा ऐकून लक्षात ठेवायचे.

काशी मध्ये १५ वर्ष शेष सनातन यांच्या सानिध्यात राहून त्यांनी वेदांचा अभ्यास केला होता. यानंतर ते राजापूरला परतले व विवाह केला. मात्र प्रापंचिक वादामुळे त्यांचा विवाह फार काळ टिकला नाही.

असं म्हणतात की स्वतः महादेव व माता पार्वती यांनी तुलसीदासांना अयोध्येत येऊन हिंदी मध्ये काव्य रचना करण्याची प्रेरणा दिली होती ज्यांनानंतर त्यांनी १६६१ मध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर रामचरितमानस लिहिण्यास सुरुवात केली होती. २ वर्ष ७ महिने व २६ दिवसात त्यांनी हे महाकाव्य पूर्ण केले.

तुलसीदासांनी रामायण व हनुमान चालीसा सुद्धा अवधी भाषेत लिहिली होती. हनुमान चालीसा मध्ये काळाच्या पुढे जाऊन त्यांनी पृथ्वी व सूर्यातील अंतराचे तंतोतंत वर्णन केले होते.

तुलसीदासांनी अनेक महाकाव्ये लिहिली होती मात्र रामचरित मानसच्या रूपात त्यांनी जगाला मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांचे जवळून दर्शन घडवून दिले.