पुरुषांचे पोट वाढणे ही खरंतर सामान्य गोष्ट. एकाएकी कोणाचे पोट खूप वाढत असेल तर तो व्यक्ती सुखी आहे किंवा त्याला काही ताण नाही असेही आपण म्हणतो. पण एका कॅलिफोर्नियातील एका ४७ व्यक्तीचे पोट दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्याचे नाव, हेक्टर हर्नांडेज, त्यानेही कदाचित आपण जाड होत असल्याने पोट वाढत असेल असे वाटून त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर हे पोट इतके वाढले की रस्त्याने लोक त्याच्या पोटाकडेच पाहायचे. हेक्टर म्हणतात, हे वाढलेले पोट झाकण्यासाठी मी जॅकेट वापरायचो. इतकेच नाही तर ऑफीसमध्ये खुर्चीत बसल्यावर माझे पोट माझ्या दोन पायांच्या मध्ये यायचे.

अनेकांना तर मी दारु जास्त पितो म्हणून माझे पोट वाढते असे वाटायचे. त्यामुळे त्यांनी मला दारु न पिण्याचा सल्लाही दिला असे ते म्हणाले. इतकेच नाही तर आपण जास्त खातो म्हणून आपले पोट वाढले असे वाटल्याने त्यांनी आपल्या खाण्यापिणेही कमी केले. तरीही काहीच फरक पडला नाही. मग हे पोट इतके वाढले की त्यांना आपल्या बुटांची लेस बांधण्यासाठी खाली वाकणेही अशक्य झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशाप्रकारे पोट वाढत असताना त्यांच्या शरीराचा इतर भाग मात्र बारीक होत चालला होता.

हेक्टर यांनी डॉक्टरांची भेट घेतली. मात्र डॉक्टरांनीही लठ्ठपणामुळे पोट वाढत असल्याचे सांगितले. मग हेक्टर यांनी दुसऱ्या डॉक्टरांचे मत घेतले. तेव्हा त्यांना एक दुर्मिळ कर्करोग असल्याचे लक्षात आले. यामध्ये लठ्ठपणाच्या पेशींची निर्मिती होऊन त्यांच्या पोटात ट्यूमर तयार झाला होता. या ट्यूमरमुळे त्यांना दुखत नसले तरीही त्याचा त्यांच्या शासोच्छवासावर परिणाम झाला होता. तसेच यामध्ये त्यांना बद्धकोष्ठतेचाही त्रास व्हायला लागला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन हा ट्यूमर काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझ्या पोटात ३५ किलो वजनाचा ट्यूमर सापडला असे हेक्टर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. आपली ही शस्त्रक्रिया ६ तास चालली असेही त्यांनी सांगितले. आपण पहिल्यांदाच इतका मोठा ट्यूमर शस्त्रक्रिया करुन काढले असे ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. अशाप्रकारचे टयूमर साधारणपणे १० ते १५ किलोच्या दरम्यान असतात. पण इतका मोठा ट्यूमर असलेला रुग्ण आम्हीही पहिल्यांदाच पाहिला असे ते म्हणाले.