Turkey Earthquake: टर्कीमध्ये मागील दोन दिवसात सलग आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी हाहाकार माजवला. टर्कीप्रमाणे सीरियामधील काही भागांमध्येही भूकंपामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे टर्कीमधील अनेक शहरं बेचिराख झाली आहेत. सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या इमारती, घरांच्या ढिगाऱ्यामधून तेथील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांनी टर्कीला मदत देऊ केली आहे.
या परिस्थितीमध्ये टर्कीमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधी मोहम्मद साफा यांनी हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेली एक लहान मुलगी धाकट्या भावाच्या डोक्यावर हात ठेवून आहे, जेणेकरुन तिच्या कोपरावर वरच्या ढिगाऱ्याचा भार येईल आणि भावाला त्रास होणार नाही. साफा यांनी फोटोद्वारे सर्वांना कठीण काळामध्ये सकारात्मक राहण्याची विनंती केली आहे.
त्यांनी फोटोला ‘सात वर्षांची ही लहान मुलगी सलग १७ तास आपल्या लहान भावाचा बचाव करण्यासाठी त्याच्या डोक्यावर मायेने हात ठेवून होती. त्या दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यामध्ये यश आले आहे. या फोटोसह सकारात्मक विचार इतरांपर्यंत पसरवा’ असे कॅप्शन जोडले आहे. व्हायरल झालेल्या या फोटोखाली नेटीझन्सनी त्या चिमुकलीचे कौतुक करत अपघातग्रस्त नागरिकांसाठी प्रार्थना केली आहे. एका यूजरने ‘आजही चमत्कार घडतात’, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने तिला सुपरहिरोची उपमा दिली आहे.
विश्लेषण : तुर्कस्तान-सीरियामध्ये वारंवार भूकंप का होतात?
सध्या सोशल मीडियावर भूकंपाग्रस्त भागातील अनेक भयावह व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. असा स्थितीमध्ये या चिमुकलीच्या फोटोमुळे काही प्रमाणामध्ये सकारात्मकताचा पसरवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन मोहम्मद साफा यांनी केले आहे.