टर्कीमध्ये एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसत आहेत या भुकंपात हजारो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. संपुर्ण जग या भयंकर नैसर्गिक संकटामुळे घाबरुन गेलं आहे. निसर्गाचा कोप झाल्यावर त्यापुढे कोणाचंच काही चालत नाही म्हणतात, याचा प्रत्येय या भयंकर घटनेतून येत आहे. टर्की आणि सीरियाच्या उत्तर भागात झालेल्या भीषण भूकंपामुळे अनेक मोठमोठ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्याची भयंकर दृश्य समोर येत आहेत.
टर्कीमध्ये सोमवारी तीन भूकंपाचे धक्के बसल्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून अंकारा प्रांतातील मध्य गोलबासी शहरात हा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आही. सोमवारी टर्कीमध्ये झालेले भूकंप हे अनुक्रमे ७.८, ७.६, आणि ६.० रिश्टर स्केलचे होते. या भूकंपांमुळे टर्की आणि सीरियामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असून अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेत ४ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
भूकंपानंतर व्हायरल झालेले काही व्हिडीओ –
सध्या सोशल मीडियावर या भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या मोठमोठ्या इमारतीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओतील हृदयद्रावक आणि तितकेच भयंकर दृश्य पाहून तुमचे मन देखील हेलावून जाईल. विनाशकारी भूकंपानंतर अनेक इमारती आणि हजारो घरे आता जमीनदोस्त झाल्याचं या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये दिसत आहे.
टर्कीमध्ये सध्या मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला तेथील उंच इमारती पडल्यानंतर ढिगाऱ्यांचा डोंगर तयार झाल्याचं दिसत आहे. या ढिगाऱ्यातून त्यातून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु असून जखमींना रुग्णालयात नेले जात आहे.
टर्कीमध्ये ७ दिवसांचा राष्ट्रीय शोक –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी पहाटे झालेल्या या विनाशकारी भूकंपाच्या अनेक धक्क्यांनी टर्की हादरले आहे. टर्की आणि सीरियातील भूकंपातील मृतांचा आकडा हजारोंमध्ये आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत, ज्यांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी भूकंपग्रस्तांना शक्य ती सर्व मदत केली जात असल्याचे सांगितलं असून या विनाशकारी भूकंपानंतर तिथे ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.