जगभरात सध्या करोनासारख्या आजारानं थैमान घातलं आहे. अशातच असा कोणता देश असेल ज्या ठिकाणी अद्यापही करोनाची लक्षणं दिसली नसतील. या परिस्थितीत आणखी एक माहिती समोर आली आहे. तुर्कमेनिस्ताननं कथितरित्या करोना व्हायरस याच शब्दावर बंदी घातली आहे.
तुर्कमेनिस्तान सरकारद्वारे देण्यात आलेल्या आदेशनानंतर स्थानिक माध्यमं आणि आरोग्य मंत्रालयाकडून वाढण्यात येणाऱ्या माहिती पत्रकांमधूनही हा शब्द हद्दपार झाला आहे. तसंच या देशानं लोकांच्या मास्क घालण्यावरही बंदी घातल्याची माहिती समोर येत आहे. इंडिपेंडन्टनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तसंच या देशात करोनाचा एकही रूग्ण नसल्याचंही म्हटलं जात आहे.
ज्या व्हायरसबद्दल संपूर्ण जगभरात चर्चा आहे, अशा व्हायरसबद्दल बोलल्यानंतर पोलीस त्यांना डिटेन करत असल्याचं म्हटलं जात आहे. रेडिओ अझातलीकच्या रिपोर्टनुसार सामान्य लोकांमध्ये स्पेशल एजन्ट्स साध्या कपड्यांमध्ये वावरत असतात आणि त्यांचं बोलणं लपून ऐकत देखील असतात. करोना व्हायरस बद्दल कोणी चर्चा करत आहे का त्याचा शोध ते घेत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. देशात करोनाचा रूग्ण नसतानादेखील याचा प्रसार रोखण्यासाठी सरकार काम करत आहे. स्थानकांवर तापमान तपासण्यापासून गर्दीच्या ठिकाणी साफसफाईसारखी कामंही सरकारनं हाती घेतली आहेत. तसंच आंदोलनांवरही बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
लोकांचा जीव धोक्यात
करोना व्हायरसशी निगडीत कोणतीही बंदी तुर्कमेनिस्तानच्या लोकांचा जीव धोक्यात घालू शकतं असं मत ‘रिपोर्टर्स विथाऊट बॉर्डर’च्या पूर्व युरोप आणि मध्ये आशिया डेस्कच्या प्रमुख जेनी कॅव्हेलिअर यांनी व्यक्त केलं. तुर्कमेनिस्तानच्या नागरिकांना करोनाबद्दल मर्यादित माहिती आहे, असं त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.