Mumbai international Airport Viral News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत “अच्छे दिन आनेवाले है” असं आश्वासन भारतीय नागरिकांना दिलं होतं. परंतु, आठ वर्षांचा कालवधी उलटूनही या देशात चांगले दिवस आले का? असा प्रश्न ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका पोस्टच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे उपस्थित करण्यात आला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन सामोसे, एक चहा आणि पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी ४९० रुपये मोजावे लागले, असा दावा फराह खान या ट्विटर युजरने केला आहे. फराह खान ही एक पत्रकार असून ट्विटरवर शेअर केलेल्या तिच्या पोस्टमुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
समोसा,चहा आणि पाण्याच्या ४९० रुपयांच्या बिलानं सोशल मीडियावर उडवलीय खळबळ
फराहने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. एक फोटो समोसा आणि चहाचा असून दुसरा फोटो स्टॉलवरील बिलाचा आहे. दोन समोसे, एक चहा आणि पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी ४९० रुपये द्यावे लागले, असं दावा तिने या पोस्टच्या माध्यमातून केला आहे. तर कॅप्शनमध्ये लिहिलंय, “खूप चांगले दिवस आले आहेत”. या तीन छोट्या गोष्टींसाठी जादाचे पैसे मोजावे लागल्याने फराहने अप्रत्यक्षपणे मोदी सरकारला टोला लगावला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “बाहेरच्या हॉटेलमध्ये आणि विमानतळावर असलेल्या राईसच्या दरातील फरक समजून घेतला पाहिजे. या दरांमध्ये एव्हढा फरक का आहे? यामागचं कारण समजून घेतलं पाहिजे. कॉंग्रेसची सत्ता असो किंवा मोदी सरकार असो, या दरांमध्ये असलेला फरक असाच राहिला असता.” तसंच अन्य एका नेटकऱ्यानं म्हटलं, “हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर खाद्यपदार्थांचे असलेले दर परवडणारे आहेत. स्थानिक हॉटेलमध्ये १५ रुपयांना समोस्याची विक्री करुनही नफा मिळवला जातो. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही नऊ वेळा पैसे देणार आहात का? हा वेडेपणा आहे…अशा गोष्टींचं समर्थन होत असल्याचं मला दिसत नाहीय. फक्त आंधळे भक्त असा मुर्खपणा स्विकारू शकतात.”