‘जुळ्याचे दुखणे’ ही म्हण आपण अनेकदा वापरतो. याचे कारण म्हणजे जुळ्या बहीण-भावंडांच्या सगळ्याच गोष्टी एकसारख्या असतात. त्यांना त्यांच्या दिसण्यापासून राहण्यापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी सारख्या असल्याने त्यांना ओळखणेही काही वेळा कठीण होऊन बसते. आता जुळे असल्याने एकसारखे कपडे किंवा वस्तू वापरणे इथपर्यंत ठीक आहे. पण जुळ्या बहीणींनी बाळांना जन्म देणे ही गोष्टही एकाच वेळी केल्याने आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे. कॅलिफोर्नियामधील या जुळ्या बहीणींनी अवघ्या तासाभराच्या अंतराने मुलींना जन्म दिला आहे. त्यामुळे जुळ्या बहीणींना एकाचवेळी मुली झाल्याने अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट घडली आहे.
These newborn babies at @CommunityMed are cousins, born one hour apart last night. But guess what? Their moms are TWIN SISTERS!!
या दोघीही बहीणी योगायोगाने एकाचवेळी गर्भवती होत्या. मात्र त्यांच्या प्रसूतीच्या तारखा दोन दिवसांच्या अंतराने होत्या. मात्र दोघींना अनपेक्षितरित्या एकाचवेळी प्रसूती कळा सुरु झाल्या. आपल्या पोटात दुखत असल्याचे यातील एकीने दुसरीला सांगितले. तेव्हा माझ्याही पोटात दुखत असल्याने मला तुझ्यासोबतच आत यावे लागेल असे दुसरी म्हणाली. विशेष म्हणजे या दोघींनी मुलींनाच जन्म दिला आहे. आपल्यालाही ही गोष्ट अनपेक्षित असल्याने हा एकप्रकारचा चमत्कार असल्याचे मत या दोघींनीही व्यक्त केले आहे. या दोघींची प्रसूती करणारी नर्स म्हणाली, मी मागील १८ वर्षापासून मी या रुग्णालयात काम करत आहे. मात्र पहिल्यांदाच अशाप्रकारे जुळ्या बहीणींनी एका दिवशी मुलींना जन्म दिल्याची घटना घडली आहे. आम्ही कायम सगळ्या गोष्टी एकत्र केल्या. पण त्यामुळे आम्ही बाळांनाही एकाचवेळी जन्म देऊ असे आम्हाला कधीच वाटले नव्हते असे सांगत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. जुळ्या बहीणी आणि त्यांची नवजात बालके सुखरुप असल्याचे सांगण्यात आले आहे.