Twitter CEO Parag Agarwal Trending: ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांच्याजागी इलॉन मस्क यांनी पदभार स्वीकारला आहे. या मोठ्या बदलाने एकीकडे अग्रवाल यांचे मोठे नुकसान झाले असले तरी दुसऱ्याच एका पराग अग्रवालला फायदा झाला आहे. पराग अग्रवाल याने स्वतः लिंक्डइनवर याबाबत पोस्ट करून माहिती दिली आहे. मी तुमचा सीईओ नाही असे म्हणत अग्रवाल याने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ही चर्चा नेमकी काय आहे हे सविस्तर पाहुयात ..
सोशल नेटवर्किंग साइट लिंक्डइनवर पराग अग्रवाल अशा अकाऊंटवरून केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हे अकाउंट ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांचे नसून बँक कर्मचारी पराग याचे आहे. ट्विटरच्या सीईओ पदावरून पराग अग्रवाल बाहेर पडताच लिंक्डइनवर अनेकांनी त्यांचे नाव शोधण्यास सुरुवात केली असावी यामुळे बँकर पराग अग्रवाल यांच्या प्रोफाईलच्या व्ह्यूजमध्ये तब्बल ३६ टक्के वाढ झाली आहे. लोकांचा हा गोंधळ पाहातच स्वतः बँकर अग्रवाल याने पोस्ट लिहिली आहे.
बँकर पराग अग्रवाल याने “लोकांना योग्य पराग शोधण्यात मदत करण्यासाठी…” अशा कॅप्शनसहित ही पोस्ट केली त्यानंतरही अनेकांचा गोंधळच होत होता, शेवटी परागने आपला लिंक्डइन प्रोफाईलचा बायो बदलून “मी तुम्ही शोधत असलेला सीईओ नाही”, असे लिहिले आहे.
विराट कोहलीने रूमचा Video Viral करणाऱ्या हॉटेलबाबत घेतला ‘हा’ निर्णय; नेटकरी करू लागले कौतुक
दरम्यान, बँकर पराग अग्रवाल याच्या पोस्टला आतापर्यंत ८१ हजार लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपलं मत मांडलं आहे. काहींनी कमेंटमध्ये म्हंटलं की, यापूर्वी १८ सप्टेंबरला पण तुझ्या अकाउंट व्ह्यूजमध्ये ६७% वाढ झाली होती तेव्हा तर ट्विटर सीईओ पराग अग्रवाल यांची काहीच चर्चा नव्हती. हे सर्व तुझ्या मेहनतीचं फळ आहे आणि लोकं तुलाच शोधत आहेत असे म्हणत अनेकांनी बँकर अग्रवाल याला प्रोत्साहन दिले आहे.