आज ट्विटर ११ वर्षांचं झालं. २१ मार्च २००६ ला सुरु झालेली ही ‘मायक्रोब्लाॅगिंग’ साईट आज सोशल मीडियाचा अविभाज्य भाग बनली आहे. ट्विटर सुरू झालं तेव्हा आॅर्कुट, याहू मेसेंजरचा जमाना होता. फेसबुक सर्वसामान्यांसाठी सुरूही झालं नव्हतं. ब्लाॅग म्हटलं की सगळ्यांच्या नजरेसमोर विस्तृतपणे लिहिण्याचा ब्लाॅग यायचा. अशा वेळी १४० कॅरेक्टर्समध्ये काय लिहिणार अशी शंका सगळ्यांच्या मनात आली. ती खरीही होती म्हणा. एकूणच विस्तृतपणे लिहिण्याचा जमाना असताना एवढ्याशा स्पेसमध्ये किती काय लिहिणार हा विचार मनात येणं साहजिक आहे. ट्विटर सुरू झाल्यावरही या टीचभर जागेत फक्त बोरिंग आयुष्य जगणारे लोकंच काहीबाही खरडतील असा या क्षेत्रातल्या तज्ञांचा अंदाज होता. त्यामुळे ही आयडिया फ्लाॅप होणार असंच मत सगळ्यांनी व्यक्त केलं. यापुढे काय झालं तो इतिहासच आहे!
जगातले अनेक राजकीय नेते, फिल्मस्टार्स आणि इतर प्रसिध्द व्यक्तींशी संवाद साधण्याची थेट संधी त्यांच्या फॅन्सना ट्विटरमुळे मिळाली. हे सितारेही थेट व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या चाहत्यांशी बोलू लागले. सुरूवातीला प्रसिध्दीच्या तंत्राचा वापर करत आपली वाढ करणाऱ्या या साईटचा वापर वेगवेगळ्या अंगांनी होत गेला. यूझर्सच्या वापरानुसार ट्विटरचं सायबर स्पेसमधलं महत्त्व आणि योगदान सतत बदलत राहिलं.
ट्विटरबद्दलच्या काही फॅक्ट्स पाहू
-आजच्या घडीला ट्विटरचे जगभर सुमारे ३२ कोटी अॅक्टिव्ह यूझर्स आहेत.
- ट्विटर यूझर्सपैकी ८६% यूझर्स ट्विटरचा वापर बातम्या मिळवण्यासाठी करतात.
- जागतिक नेत्यांपैकी ८३% नेते ट्विवरवर आहेत.
-जगातलं सगळ्यात पहिलं ट्वीट पहायचंय? हे पहा
just setting up my twttr
— jack (@jack) March 21, 2006
हा ट्विटरचा सगळ्यात पहिला यूझर आणि हे त्याचं सर्वात पहिलं ट्वीट
-‘टायटॅनिक’ (१९९७) मधून जगभर प्रसिध्द झालेला हाॅलिवूड स्टार लिओनार्डो डिकॅप्रिओला २०१६ साली ‘द रेव्हेनंट’ साठी अभिनय कारकीर्दीतलं सर्वात पहिलं आॅस्कर मिळालं. यावेळी जगभर त्याचे चाहते एवढे खुश झाले की त्याला आॅस्कर मिळताना त्याच्यासंबंधी मिनिटा जवळजवळ साडेचार लाख ट्वीट्स होत होती.
-जगात सर्वात जास्त ट्विवर फाॅलोअर्स ‘केटी पेरी’चे आहेत. ही एक तुफान लोकप्रिय अमेरिकन सिंगर असून तिचे जवळजवळ १० कोटी फाॅलोअर्स आहेत.
गेल्या दशकात घडलेल्या अनेक राजकीय घटनांवरही ट्विटरचा मोठा प्रभाव पडला. २०११ मध्ये इजिप्तमध्ये तिथला हुकूमशहा होस्नी मुबारक याच्या विरूध्द झालेल्या तिथल्या जनतेच्या उठावाच्या वेळी ट्विटरचा वापर करत आंदोलनकर्त्यांनी सामान्य जनतेत माहिती पसरवली होती.
ट्विटरवर अर्थातच ‘खोटी अकाऊंट्स’सुध्दा आहेत. अनेकजण ट्विटरच्या माध्यमातून गरळ ओकण्याचं कामही अतिशय चिकाटीने करतात. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण असावं.
कुठल्याही गोष्टीमध्ये चांगली, वाईट बाजू असतेच. पण त्यासाठी त्या गोष्टीलाच नाव ठेवून काही फायदा नाही. सोशल मीडियाचं एक अविभाज्य अंग आणि त्याच्या बदलत्या स्वरूपावर मोठा प्रभाव टाकणारं ‘ट्विटर’ यापुढेही मीडियातला एक ‘डाॅमिनंट फोर्स’ राहणार आहे.