महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे घरोघरी आगमन झाले आहे. त्याच्या आगमनाने वातावरण आनंदित झाले. घराघरात सुख घेऊन आलेल्या या देवाने नेटीझन्ससाठी देखील एक खुशखबर आणली आहे. गणपतीच्या काळात बाप्पांचे फोटो अनेक जण सोशल मीडियावर अपलोड करतात आणि त्याचबरोबर वेगवेगळे हॅशटॅग वापरून आपल्या बाप्पांचे वर्णन अनेक जण करतात. हेच लक्षात घेऊन ट्विटर इंडियाने यावर्षीपासून नवा प्रयोग केला आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी ट्विटर इंडियाने याची अधिकृत घोषणा केली होती. त्यामुळे आता गणेश चतुर्थीनिमित्त वापरण्यात आलेल्या विविध हॅशटॅगच्या नंतर बाप्पाच्या रुपातले इमोजी दिसणार आहेत. #Ganesh #Ganeshotsav #GaneshChaturthi #Ganapati #Ganesha #गणपति #गणेश #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव यांसारख्या हॅशटॅगनंतर बाप्पांचे इमोजी दिसणार आहे.
आपल्या भारतीय युजर्सना खूष करण्यासाठी ट्विटरने हा प्रयोग केला आहे. याआधी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी यावेळी इमोजी असलेले हॅशटॅग ट्विटर इंडियाने आणले होते. पण पहिल्यांदाच ट्विटरने एकाहून अधिक हॅशटॅगमध्ये बाप्पांचे इमोजी आणले आहे. विशेष म्हणजे फक्त इंग्रजीत नाही तर मराठी हॅशटॅशचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. ट्विटर इंडियाच्या या प्रयोगामुळे नेटीझन्स तर खुश आहेत पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून ट्विटर इंडियाचे आभार मानले आहे. त्यामुळे सकाळपासून ट्विटरवर बाप्पांचे आगमन ट्रेंडिगमध्ये आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा