करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशामध्ये हाहाकार उडवलेला असतानाच दुसरीकडे करोना या विषयावरुन अनेक राज्यांमध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. असं असतानाच एका ज्येष्ठ पत्रकाराने काही दिवसांपूर्वी देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री कोण होते हे जाणून घेण्यासाठी घेतलेल्या ट्विटरवरील जनमत चाचणीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक म्हणजेच ६२ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. सध्या सोशल नेटवर्किंगवर शिवसेना समर्थकांकडून या पोलचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल केले जात आहेत.
ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून करोनाच्या कालावधीमध्ये सर्वात चांगल्या पद्धतीने काम करणारे देशातील मुख्यमंत्री कोण असा ट्विटर पोल घेतला होता. “कोणत्या मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीमध्ये सर्वोत्तम नियोजन केलं?”, असा प्रश्न विचारत चावला यांनी दोन पोल घेतले होते. एका पोलला चारच पर्याय देता येत असल्याने त्यांनी दोन पोल घेत आठ मुख्यमंत्र्यांचे पर्याय दिले होते.
पहिल्या पोलमध्ये दोन लाख ६७ हजार २४८ जणांनी आपलं मत नोंदवलं. यापैकी ६२.५ टक्के मत ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाली. म्हणजेच दोन लाख ६७ हजार २४८ जणांपैकी एक लाख ६७ हजार ३० मतं उद्धव यांना मिळाली. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३१.६ टक्के तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ४.६ टक्के आणि केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना १.३ टक्के मत मिळाली. म्हणजेच योगी यांना एकूण ८४ हजार ४५० मतं मिळाली. केजरीवाल यांना १२ हजार २९३ तर विजयन यांना ३ हजार ४७४ मतं मिळाली.
Which Chief Minister has handled the second #Covid wave most effectively? @vijayanpinarayi @myogiadityanath @ArvindKejriwal @CMOMaharashtra
— PrabhuChawla (@PrabhuChawla) May 19, 2021
याच प्रश्नावरआधारीत दुसऱ्या पोलममध्ये एकूण दोन लाख ३४ हजार २६१ जणांनी आपलं मत नोंदवलं. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना सर्वाधिक म्हणजेच ४९ टक्के मत मिळाली. त्या खालोखाल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना ४८.५ टक्के मत मिळाली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या वाट्याला १.७ तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना केवळ ०.५ टक्के मतं मिळाली. म्हणजेच शिवराजसिंह चौहान यांना १ लाख १४ हजार ७८८ मतं मिळाली. त्या खालोखाल पटनायक यांना १ लाख १३ हजार ६१६ मतं तर अमरिंदर सिंग यांना ३ हजार ९८२ मतं मिळाली. येडियुरप्पा यांच्या वाट्याला अवघी १ हजार १७१ मतं आली.
Which of the Chief Ministers has handled second #Covid wave most effectively? @Naveen_Odisha @capt_amarinder @BSYBJP @ChouhanShivraj
— PrabhuChawla (@PrabhuChawla) May 19, 2021
याच पोलच्या आधारे आता शिवसेनेचे समर्थक देशामध्ये दुसऱ्या लाटेदरम्यान कामगिरी करणाऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे हे बेस्ट सीएम ठरल्याचा प्रचार सोशल नेटवर्किंगवर करत आहेत.