आजकाल ‘आ बैल मुझे मार’ करण्याचा सगळ्यात मोठा, स्वस्त आणि सोपा उपाय कोणता तर एखाद्या गोष्टीवरून ट्विटर किंवा फेसबुकवर आपलं मत व्यक्त करणं. नाही तुम्हाला हाणायला जगभरातून उड्या पडल्या तर बघा! म्हणजे आपलं मत निर्भिडपणे मांडायचा अधिकार देणारी व्यासपीठं आहेत खरी पण यामुळे सगळ्यांच्याच हातात कोलीत मिळतं हेही तेवढंच खरं.
तुमच्या ट्वीटवर टीकाटिप्पणी (फारच सौम्य शब्द) करणारा तुम्हाला ओळखत असो वा नसो. त्याला तुमचं मत आवडलं नाही की मग दे दणादण! १४० अक्षरांच्या ‘पलीकडे’ जाणाऱ्या ‘भावना’ मग या सगळ्यांकडून व्यक्त होतात. आणि महत्त्वाची बाब म्हणजे नेहमीच्या जीवनात समोरसमोर येत ‘डोक्याला त्रास’ देणाऱ्यांची ‘काळजी’ घेता येऊ शकते. पण फेसबुक किंवा ट्विटरवर आदळआपट करणारा जगाच्या कुठल्या कोपऱ्यातून कीबोर्ड कुटतोय हे कसं कळणार? तिथेच मग गोची होते. नायतर समोर आला तर केला असता गप!
विनोदाचा भाग सोडला तर ‘आॅनलाईन दादागिरी’चा प्रकार आता गंभीर रूप धारण करतोय. इंटरनेटचा सुळसुळाट होण्याच्या आधीच्या पिढीला कदाचित मानसिकदृष्य्ट्या हे सहन करणं सोपं जाऊ शकत असेल. पण इंटरनेट आणि टॅबलेटसोबतच वाढणाऱ्या पिढीला हा प्रकार सहन करणं कठीण जाऊ शकतं.
VIRAL VIDEO: काॅपी करायची तर अशी (नाही)
आता ट्विटरने याच्यावर काही पावलं उचलायचं ठरवलंय. ट्विटरचा वापर करत दादागिरी करणाऱ्याची अकाऊंट्स सस्पेंड करण्याविषयीचे नियम आता आणखी कडक होणार आहेत. टि्वटरच्या इंजिनियरिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट एड हो यांनी यासंबंधी सूतोवाच केलंय. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी ‘गेल्या वर्षी’ आम्ही या बाबतीत कमी पडलो याची कबुली दिली आहे.
Making Twitter a safer place is our primary focus and we are now moving with more urgency than ever.
— Ed Ho (@mrdonut) January 31, 2017
This week, we’ll tackle long overdue fixes to mute/block and stopping repeat offenders from creating new accounts.
— Ed Ho (@mrdonut) January 31, 2017
We heard you, we didn’t move fast enough last year; now we’re thinking about progress in days and hours not weeks and months.
— Ed Ho (@mrdonut) January 31, 2017
VIRAL: शाहरुखच्या सेल्फीमध्ये असणारी ‘ती’ सध्या काय करतेय?
गेल्याच वर्षी आताचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरचा वापर करत प्रचंड राळ उडवली होती. ट्रम्प सारख्या पण कमी प्रसिध्द ट्विटर’भाईं’वर कारवाई करण्यात येणार एक मुख्य अडथळा म्हणजे एका अकाऊंटवर कारवाई झाल्यावर हे लोक दुसऱ्या नावाने अकाऊंट उघडतात आणि आपलं जुनं काम सुूरू ठेवतात. त्यामुळे आता फोन नंबरशी एखादं ट्विटर अकाऊंट जोडण्याची प्रक्रिया ट्विटरने आणखी जलदगतीने करावी अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.