गोवा हे अथांग समुद्रकिनारे आणि नयनरम्य नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो लोक भारतासह जगभरातून येथे पर्यटनासाठी येतात. पण, काही वेळा पर्यटक अशी काही हुल्लडबाजी करतात, ज्यामुळे पोलिसांना कायदा हातात घेण्याची वेळ येते. नुकताच गोव्यातील मोरजिम समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तरुणांनी केलेलं कृत्य पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. यावर अनेकांनी दिल्लीकरांना या ठिकाणी येण्यास बंदी घाला, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. पण, असे का? अनेक लोक इतके का संतापले, जाणून घेऊ…
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण गोव्याच्या मोरजिम समुद्रकिनाऱ्यावर गाडी पळवताना दिसत आहेत. पण नियमानुसार, मोरजिम समुद्रकिनाऱ्यावर गाडी चालवण्यास बंदी आहे, कारण हा समुद्रकिनारा टर्टल बीच म्हणून ओळखला जातो. या किनाऱ्यावर कासवांच्या संवर्धानाचे काम केले जाते. मात्र, या हुल्लडबाज तरुणांनी कासवांची पर्वा न करता समुद्रकिनाऱ्यावर बेदरकारपणे गाडी चालवण्यास सुरुवात केली. यानंतर गोव्यातील लोक इतके भडकले की, त्यांनी दिल्लीकरांना गोव्यात येण्यास बंदी घालावी अशी मागणी केली.
@goa365tv नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्याने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडीओत काही तरुण समुद्रकिनाऱ्यावर एसयूव्ही कार वेगाने पळवताना दिसत आहेत.
उत्तर गोव्यातील पेडणे या ठिकाणी ‘मोरजिम बीच’ आहे, ज्याला ‘टर्टल बीच’ या नावानेदेखील ओळखले जाते. अनेक प्रजातींची कासवं या समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळतात. प्रजननासाठी हे कासव मोरजिम किनाऱ्यावर येतात. हे ऑलिव्ह रिडले या कासवांचे मुख्य प्रजनन स्थळ आहे. कासवांची ही प्रजाती सध्या दुर्मीळ होताना दिसतेय. अशा परिस्थितीत कासवांचे संरक्षण करण्यासाठी आणि कासवांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून या समुद्रकिनाऱ्यावर कुठल्याही प्रकारची वाहनं चालवण्यास बंदी घातली आहे. मात्र, दिल्लीतून आलेल्या तरुणांनी नियमांचे उल्लंघन करून गाडी चालवली.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
दिल्लीतील या दोन तरुणांनी गोव्यात एक खाजगी कार भाड्याने घेतली, ज्यानंतर ती मोरजिम समुद्रकिनाऱ्यावर वेगाने चालवू लागले. घटनेचा व्हिडीओ समोर येताच पोलिसांनी कार जप्त केली असून आरोपीविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.