स्पेन हा देश अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्यातली एक म्हणजे बुल फायटिंग. या खेळाचे नुसते नाव जरी ऐकले तरी आपल्याला कापरे भरेल पण आजही तिथे हा खेळ खेळला जातो. या खेळाचा एक दुख:द व्हिडिओ समोर आला आहे. बुल फायटिंग खेळात कधी कधी सांड या प्राण्याची एकमेकांत लढत लावली जाते. तर कधी माणूस विरुद्ध सांड अशीही झुंज रंगते. या खेळाच्या वेळी दोन अतिशय रागावलेले सांड एकमेकांच्या अंगावर जोरात धावत आले आणि त्यांनी एकमेकांना धडक दिली पण या एकाच धडकेत ते जागच्या जागी मृत्यूमुखी पडले. या प्रसंगामुळे पुन्हा एकदा या खेळाची अमानुषता समोर आली आहे. जवळपास एक टनहून अधिक वजन असलेले हे सांड खेळाच्या सुरूवातीलाच एकमेकांच्या अंगावर धावून आले त्यांनी आपल्या शिंगानी एकमेकांना धडक दिली पण धडक बसल्यावर काही सेकंदाच्या आत हे महाकाय प्राणी जागच्या जागी कोसळले. स्पेनमधल्या नावारा टाऊन मधला हा संपूर्ण प्रकार आहे. येथील लोक वार्षिक सणाचा आनंद साजरा करत होते. त्यावेळी झुंजीचा हा खेळ ठेवण्यात आला होता.
प्राण्यांच्या हक्कांचा विचार करता या खेळामुळे अनेकदा प्राण्यांचे हाल होतात. केवळ माणसांच्या मनोरंजनांसाठी कित्येक प्राण्यांचा यातनेने तळमळून मृत्यू होतो. तर काही वेळा या खेळात माणसेही गंभीररित्या जखमी होतात. त्यामुळे या खेळावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी प्राणीप्रेमी संघटनेकडून होत आहे. पण हा स्पेनचा पारंपारिक खेळ आहे आणि शेकडो वर्षांचा इतिहास या खेळामागे आहे त्यामुळे हा खेळ बंद करण्यामागे कोणतेही ठोस पाउल स्पेनमध्ये अद्यापही उचलले जात नाही. स्पेनच्या कित्येक भागत या खेळाला कायद्याने मान्यता दिली आहे. या बुल फायटिंगचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा या खेळामागचे भीषण वास्तव समोर आले आहे.