मोठ मोठ्या चोरांना पोलिसांनी पकडलंय, आता याच रक्षकांना कधी चोरी करताना पाहिलंत का? मग हरियाणा पोलिसांचा प्रताप पाहा. या पोलिसांनी चक्क भर बाजारात कलिंगडाची चोरी केलीय. पोलिसांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय, तेव्हा हरियाणा पोलिसांची मान शरमेने खाली घालणाऱ्या दोन्ही पोलिसांना बडतर्फ करण्यात आलंय.
सुनेहरा सिंग आणि पवन कुमार अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघंही रात्रपाळीला असताना त्यांनी ही चोरी केली. हरियाणातल्या जंग जिल्ह्यात सफीदों येथील बाजारात हे दोघंही पोलीस गस्त घालत होते. तेव्हा मंडईतल्या एक फळ विक्रेत्याची कलिंगडांनी भरलेली मोठी गोणी पळवून नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जेव्हा सुक्षारक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या पोलिसांनी हातातल्या दंडुक्याने सुक्षारक्षकाला रट्टे दिले. यात सुरक्षारक्षकही जखमी झाला. मंडईत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पोलिसांचा हा प्रकार कैद झालाच त्याचबरोबर मंडईतल्या सुरक्षा रक्षकाने देखील त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. तेव्हा या दोन्ही पोलिसांना आता सेवेतून निलंबित करण्यात आलंय.