मध्य प्रदेशातल्या मैहर या ठिकाणी शारदा मंदिर आहे. प्रख्यात सरोद वादक बाबा अल्लाउद्दीन खान यांच्या मैहर घराण्यासाठी हे मंदिर ओळखलं जातं. या मंदिराला एक मोठा धार्मिक इतिहास आहे. मात्र आता राज्य सरकारने आदेश दिला आहे की या मंदिरात मुस्लीम कर्मचारी काम करू शकणार नाहीत.राज्याच्या संस्कृती धार्मिक न्यास मंत्रालयाच्या उप सचिव पुष्पा कलेश यांच्या सहीने एक पत्र मंदिर समितीला देण्यात आलं आहे. यामध्ये देण्यात आलेल्या निर्देशांचं पालन केलं आहे का? याचा अहवाल सादर करा असंही या मंदिर प्रशासनाला सांगण्यात आलं आहे. हे पत्र १७ जानेवारीला मंदिर प्रशासनाला देण्यात आलं आहे.
राज्य सरकारच्या नियमांनुसार धर्माच्या आधारावर कुठल्याही मंदिरातून कर्मचाऱ्याला हटवता येत नाही. मात्र शारदा मंदिरात १९८८ मध्ये काम करणाऱ्या दोन मुस्लीम कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. मैहर या ठिकाणी मांस आणि मद्य विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान दिलेला आदेश कथित दक्षिणपंथी संघटना आणि विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या समर्थकांनी उषा सिंह ठाकूर यांना संपर्क केल्यानंतर उषा ठाकूर यांनी हे पत्र दिलं होतं. या पत्रानंतर आता मैहेर शारदा मंदिरात काम करणाऱ्या दोन मुस्लिम कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची चिन्हं आहेत. एनडीटीव्हीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
मैहरचे प्रसिद्ध संगीतकार आणि मैहर घराण्याचे संस्थापक बाबा अल्लाउद्दीन खान यांचं घर होतं. अल्लाउद्दीन खान यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात खूप मोठं योगदान दिलं आहे. पंडित रविशंकर, पंडित निखिल बॅनर्जी त्यांची मुलगी अन्नपूर्णा देवी आणि मुलगा उस्ताद अली अकबर खान यांचा समावेश आहे.
मैहरच्या महाराजाच्या दरबारात संगीतकार म्हणून काम करणारे अलाउद्दीन खान यांनी अनेक शास्त्रीय रागांची रचना केली आहे. त्यांना याचं श्रेय जातं. असं म्हटलं जातं की शारदा मंदिराला असणाऱ्या १ हजार ६३ पायऱ्या चढून अलाउद्दीन खान रोज मंदिरात जात होते. देवीच्या समोर ते रियाज करत असत असंही सांगितलं जातं. पंडित रविशंकर यांनीही हे सांगितलं की आहे अलाउद्दीन खान यांच्या घरात भगवान कृष्ण, येशू ख्रिस्त, काली माता यांच्या फोटोंनी भरलेलं होतं. आजही त्या तसबिरी त्यांच्या घरात आहेत.