Delhi Building Collapsed Video Viral: गेल्या चार-पाच दिवसांपासून राजधानी आणि लगतच्या शहरांमध्ये सतत पाऊस कोसळत आहे. पावसामुळे दिल्लीतील अनेक भागांत पाणी साचले आहे. तसेच ट्रॅफिक जॅमनेही दिल्लीकर हैराण झाले आहेत. नुकताच रोहिणी परिसरात पाण्याने भरलेल्या उद्यानात बुडून एका बालकाचा मृत्यू झाला होता. अशोक नगर येथे झाड पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले. याच्या दोन दिवसांपूर्वी मॉडेल टाऊनची दोन मजली इमारत कोसळली होती. त्या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला आहे, कारण इमारत कोसळल्याचा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने हे दृश्य पाहून घाबरून पळ काढला आणि आता दोन दिवसांनी तो परत आल्यावर त्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी इमारतीचा मालक आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर इमारत जीर्ण झाली होती. यामुळे शनिवारी मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सुमारे २७ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये इमारत अचानक कोसळल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील महेंद्रू एन्क्लेव्हमध्ये ही घटना घडली, जेथे दुरुस्तीचे काम सुरू असलेले एक जीर्ण घर दुपारी तीनच्या सुमारास कोसळले. इमारत कोसळताना पाहणाऱ्या साक्षीदाराने घटनास्थळावरून पळ काढला. त्याच्या मुलालाही दुखापत झाली. ढिगाऱ्यातून सुटका करण्यात आलेल्या एका व्यक्तीला बसई दारापूर येथील ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य जखमींना दीपचंद बंधू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशाल, पवन आणि जयसिंग अशी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्यांची नावे आहेत. २८ वर्षीय जेसीबी क्रेन चालक विशाल याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमींची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हे ही वाचा : ‘या’ रेल्वेचे भाडे ऐकून नेटकरी संतापले, तिकिटाचे दर पाहून तुम्हालाही फुटेल घाम, रेल्वेच्या तिकिटाचा फोटो होतोय तुफान व्हायरल )
येथे पाहा व्हिडीओ
पावसामुळे जुन्या इमारतींची दुरवस्था
दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या अहवालानुसार, शुक्रवारी डिचौन भागात मुसळधार पावसामुळे एमसीडी शाळेची भिंत कोसळली आणि एक झाड उन्मळून कारवर पडले. या अपघातात दुचाकीसह झाडाखाली उभे असलेले दोघे जण जखमी झाले. जखमी व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दुसऱ्या अपघातात २ ऑगस्ट रोजी उत्तर-पश्चिम दिल्लीतील जहांगीरपुरी भागात इमारतीचा काही भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. इतर चार लोकांना वाचवण्यात यश आले. मुसळधार पावसामुळे संपूर्ण दिल्लीतील जुन्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांनी जुन्या इमारतींपासून दूर राहावे, जेणेकरून अपघात टाळता येतील.