आज कालच्या विज्ञानच्या युगात कधी कोणता चमत्कार होईल याचा नेम नसतो. अशीच विज्ञानाची कृपा असलेला, संयुक्त अरब अमिरातीमध्ये डॉक्टरांनाही विचार करायला भाग पाडेल अशी एक घटना समोर आली आहे. येथे एक महिला तब्बल २७ वर्षांनंतर कोमातून बाहेर आल्याचे समोर आले आहे.
मुनिरा अब्दुल्ला असे या महिलेचे नाव आहे. १९९१ साली त्यांची कार शाळेच्या बसला ठोकून भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या मेंदूला मोठ्या प्रमाणावर इजा झाली आणि त्या तेव्हापासून कोमात गेल्या. अपघातावेळी त्यांचा ४ वर्षांचा मुलगा ओमर त्यांच्या सोबत होता. परंतु मुनिरा यांनी अपघाता दरम्यान ओमरला घट्ट धरुन ठेवल्यामुळे त्याच्या डोक्याला फक्त मुका मार लागला होता. अपघातानंतर मुनिरा यांना तातडीने संयुक्त अरब अमिराती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डोक्याला गंभीर इजा झाल्यानंतर कोमात गेलेल्या मुनिरा कोमातून कधी बाहेर येतील हे निश्चतपणे सांगता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
अमिराती वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुनिरा यांच्या ३२ वर्षीय मुलाने सांगितले की, ‘मी कधीच आशा सोडली नव्हती. माझी आई पुन्हा परतेल असे मला नेहमी वाटत होते.’ पुढे तो म्हणतो, ‘जेव्हा माझा अपघात झाला तेव्हा मी केवळ ४ वर्षांचा होता. त्यावेळी मला शाळेत सोडण्यासाठी कोणतीही स्कूल बस नव्हती. माझी आई आणि मी गाडीमध्ये मागे बसलो होतो. अपघाता दरम्यान मला वाचवण्यासाठी आईने मला घट्ट मिठी मारली. तेव्हा मोबाईल नसल्यामुळे आम्हाला रुग्णवाहिका देखील बोलवता आली नाही. माझ्यासाठी माझा आयुष्यातील ती महत्वाची व्यक्ती आहे. मी जितका तिच्यापासून लांब राहिन तितकेच तिचे महत्व माझ्यासाठी वाढत जाईल’ असे तो म्हणाला.
जेव्हा हे प्रकरण युएईच्या क्राउन प्रिन्स कोर्टाच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी मुनिरा यांच्या उपचरासाठी मदत करण्यास सुरूवात केली. मुनिरा यांची प्रकृती सध्या चांगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अबू धाबीतील शेख जयद ग्रँड मस्जिदला भेट दिली आहे.