Uddhav Thackeray Bowing Down In Front Of Rahul Gandhi : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असणारा एक फोटो आढळून आला. या फोटोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. या फोटोमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अनेक युजर्स सोशल मीडियावर हा फोटो खरा असल्याचा दावा करत आहेत. पण, या फोटोमागे नेमकं काय तथ्य आहे हे आपण पाहूया…
काय होत आहे व्हायरल?
X युजर Amit Singh Rathore ने एडिटेड फोटो आपल्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.
इतर वापरकर्तेदेखील त्यांच्या प्रोफाइलवर हा फोटो शेअर करत आहेत.
तपास :
आम्ही व्हायरल फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला.
यावेळी ८ ऑगस्ट रोजी अहमदाबाद मिररने शेअर केलेल्या लेखात आम्हाला उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीचे फोटो सापडले.
यावरून आम्हाला कळले की, हा फोटो त्यांच्या नुकत्याच दिल्लीत झालेल्या भेटीदरम्यानचा असावा.
आम्हाला हा फोटो ANI च्या एक्स हँडलवरदेखील सापडला.
दिल्लीत झालेल्या सभेच्या वेळच्या मूळ फोटोत उद्धव ठाकरेंचे कपडे वेगळे होते, त्यामुळे आमच्या लक्षात आले की, हा फोटो एडिट केलेला आहे. त्यानंतर आम्ही फोटोच्या त्या भागावर रिव्हर्स इमेज सर्च केले, जेथे ते काँग्रेस खासदार राहुल गांधींसमोर वाकताना दिसले.
Read More Fact Check News : VIDEO : बांगलादेशात इस्लामवाद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या हिंदूंना सैन्याची भररस्त्यात मारहाण? भयंकर घटनेची संपूर्ण खरी बाजू वाचा
यावेळी आम्हाला AAP च्या एक्स हँडलवरील फोटो सापडला.
तीन फोटोंच्या कोलाजमधील तिसऱ्या फोटोत उद्धव ठाकरे हात जोडून वाकून नमस्कार करताना दिसले. पण, ही पोस्ट ८ ऑगस्टची आहे जेव्हा शिवसेना उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली होती.
याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाद्वारे पोस्ट केलेले एक ट्विटही आम्हाला आढळले, ज्यात अशाप्रकारे बनावट फोटो ट्विट करणाऱ्यांवर कारवाई करू अशी सूचना देण्यात आली आहे.
द फ्री प्रेस जर्नलमधील एका लेखात असेही नमूद करण्यात आले आहे की, शिवसेना UBT ने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबरोबरचा बनावट फोटो शेअर करणाऱ्या एक्स हँडल्सवर कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या, “भाजपाच्या हताश आयटी सेलला बनावट विधाने, बनावट गोष्टी शेअर केल्यानंतरही मतदारांचा विश्वास मिळत नसल्याने ते परत तेच करत आहेत. हे लोक बनावट फोटो परत शेअर करत आहेत आणि त्यांनी यातून कोणताच धडा घेतल्याचेदेखील दिसत नाही. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे त्यांची झालेली निराशा आणि त्यांचा आगामी राज्यांच्या निवडणुकीत खात्रीशीर होणारा पराभव पाहता ते अशी खालची पातळी गाठत आहेत, पण तुम्ही जितक्या खालच्या पातळीला जाल तितके आम्ही वर जाऊ.”
निष्कर्ष :
व्हायरल फोटोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासमोर नतमस्तक होताना दिसतात तो फोटो एडिटेड आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे फोटोसह केला जाणारा व्हायरल दावादेखील खोटा आहे.