भारतात आधार कार्ड अगदी प्रत्येक गोष्टीसाठी वापरले जात आहे. सामान्य माणसाची ओळख म्हणून हे कार्ड ओळखले जाते. जर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर काही गोष्टी जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. यूआयडीएआयने (UIDAI) आधारशी संबंधित दोन विशेष सेवा बंद केल्या आहेत. ज्याचा परिणाम आधार कार्डधारकांवर होऊ शकतो. यूआयडीएआय आधार कार्ड संबंधित सेवा पुरवत असते. परंतु यावेळी त्यांनी २ विशेष सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या गेल्या आहेत.
कोणत्या आहेत त्या दोन सेवा?
१. यूआयडीएआयने अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर (Address Validation Letter) द्वारे आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची सुविधा बंद केली आहे. या सुविधेमुळे आधार कार्डधारक सहज आपल्या पत्त्यामध्ये बदल करू शकत होते. आधारच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या हा पर्यायही हटवण्यात आला आहे.
२. या शिवाय UIDAI ने जुन्या शैलीतील आधार कार्ड रिप्रिंटची (Aadhaar Card Reprint ) सेवाही बंद करण्यात आली आहे. मोठ्या आधार कार्ड पेक्षा आता प्लॅस्टिकचे PVC Card दिले जात आहेत. या कार्डचा आकार लहान असल्यामुळे सहज पाकीट किंवा छोट्या बॅगेत ठेवण्यासाठी ते सोपे पडत आहे. म्हणूनच जुन्या पद्धतींचे कार्ड आता बंद करण्यात आले आहेत.
काय होणार परिणाम?
भाड्याने राहणाऱ्या लोकांवर याचा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. ते अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर (Address Validation Letter) द्वारे सहज आपला पत्ता अपडेट करू शकत होते. परंतु आता त्यांना पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी त्रास होऊ शकतो. तसेच ज्या लोकांकडे पत्ता सुधारित करण्यासाठी कोणतेही दस्तऐवज नाहीत, त्यांना देखील अडचणी येऊ शकतात.
पत्ता अपडेट करण्यासाठी दुसरा उपाय कोणता?
यूआयडीएआयने यासंदर्भात माध्यमांना सांगितले की, आपण पत्ता अपडेट करण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकता. इतर वैध पत्ता पुरावांच्या यादीतून आपण कोणत्याही पत्त्याच्या पुरावाद्वारे आपला पत्ता अपडेट करू शकता.