महाशिवरात्रीच्या दिवशी उज्जैनच्या महाकाल मंदिरात ११ लाख ७१ हजार दिवे लावून विश्वविक्रम करण्यात आला. उज्जैनच्या जनतेने यादरम्यान रामघाट, नृसिंह घाट, दत्त आखाडा, गुरुनानक घाट तसेच सोनेरी घाटावर एकत्रित ११ लाख ७१ हजार ७८ दिवे लावून अयोध्यामध्ये करण्यात आलेल्या ९ लाख ४१ हजार दीप प्रज्वलनाचा विक्रम तोडला आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सपत्नी क्षिप्रा नदीच्या रामघाटावर पोहोचले आणि त्यांनी १५ दिवे प्रज्वलित करून ‘शिव ज्योती अर्पण’ कार्यक्रमाला सुरुवात केली. हा कार्यक्रम रामघाटावर संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांवर सुरु झाला. दरम्यान, ११ लाख ७१ हजार ७८ दिवे प्रज्वलित केल्यानंतर महादेवाची ही नगरी उजळून निघाली.
पुतिन यांचं युक्रेननंतरचं टार्गेट ठरणार ‘हा’ देश; बेलारुसच्या राष्ट्रपतींनी चुकून उघड केलं गुपित
दीपप्रज्वलन केल्यानंतर सायंकाळी ६.४७ वाजता उज्जैनच्या सर्व घाटांचे दिवे बंद करण्यात आले. यावेळी क्षिप्रा नदीतट दिव्यांच्या प्रकाशाने झगमगत होता. सायंकाळी ६.५३ वाजता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधीच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मोजणी सुरू करण्यात आली. काही वेळातच उज्जैनने अयोध्येचा विक्रम मोडून दीप प्रज्वलित करण्याचा नवा विश्वविक्रम केल्याचे गिनीज बुकच्या निश्चल बारोट यांनी जाहीर केले.
यानंतर क्षिप्रा नदीच्या वेगवेगळ्या घाटांवर उपस्थित असलेल्या लाखो नागरिकांमध्ये आनंदाची लाट उसळली. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यावेळी सांगितले की, महाकाल महाराजांची कृपा आणि सर्वसामान्य जनतेची भक्ती, श्रद्धा आणि तपश्चर्येमुळे महाशिवरात्रीला अनोखा विक्रम प्रस्थापित करण्याचा बहुमान मिळाला. त्यांनी भगवान महाकालकडे उज्जैन नगरीवर कृपावर्षाव करण्याची तसेच प्रत्येक नागरिकाला आनंदी, निरोगी ठेवण्याची प्रार्थना केली.