साखरेचे खाणार त्याला देव देणारा ही म्हण हल्ली थोडी बदलली आहे आता चवीने खाणार त्याला देव देणार असेच म्हणावे लागले, त्याच काय झालं युकेमधला एक प्रवासी उबर टॅक्सीने प्रवास करत होता. आता हा प्रवासी पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. तेव्हा आपण काय बरळतो आहे याची त्याला जवळपास शुद्धच नव्हती. असाच इथल्या तिथल्या गोष्टी बरळताना आपल्याला भारतीय पदार्थ त्यातूनही बिर्याणी हा प्रकार खूपच आवडतो असे टॅक्सी चालकाला त्याने सांगितले. या चालकाचे नाव होते फजल.
फजलनेही आपली बायको छान बिर्याणी बनवते असे सांगितले. तेव्हा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या स्टीव्ह मिडवेने बिर्याणीची पाककृती समजून घेण्यासाठी त्याच्या बायकोचा नंबर मागितला. फजलने काही दिला नाही, पण त्याने स्टीव्हचा नंबर मात्र लिहून घेतला. माझी बायको जेव्हा केव्हा बिर्याणी बनवेल तेव्हा नक्कीच तुम्हालाही थोडी देऊ असे म्हणून त्याने स्टीव्हला इच्छित स्थळी सोडले. स्टीव्ह आधीच धुंदीत होता, तेव्हा नशा उतरल्यावर तो हे सारे विसरूनही गेला पण फजलने मात्र त्याला बिर्याणी आवडते हे चांगलंच लक्षात ठेवलं. दुस-या दिवशी न विसरता फजलने स्टीव्हला फोन करून त्याच्या घरचा पत्ता विचारला आणि बिर्याणी पोहोचवली देखील. जेव्हा फजलला पैसे देण्यासाठी स्टिव्हने हात पुढे केला तेव्हा पैसे घेण्यास त्याने नकार दिला. हे मैत्रीखातर केले असे सांगून तो निघून गेला. स्हिव्हने हा अनुभव फेसबुकवर शेअर केला. आतापर्यंत मला भेटलेला हा सगळ्यात उदार टॅक्सी चालक होता असेही त्याने फेसबुक पोस्टवर लिहिले. ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.